दिल्ली : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीने (ED) रविवारी अटक केली. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत हे 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत.
संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिंदे गटासह भाजप (BJP) नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी उघडपणे याबाबत प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जवळच्या व्यक्तीने संजय राऊत यांच्या अटकेचा आनंद व्यक्त केला आहे.
खासदार संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या ड्रायव्हरने पेढे वाटले आहेत. शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी हे पेढे वाटले आहेत. राजपूत हे धुळ्यामधून पेढे वाटण्यासाठी थेट दिल्लीला गेले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतली.
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना संपवली असेही ते म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्या अटकेचा पेढे वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
"संजय राऊत जेलमध्ये गेले आहेत त्यामुळे मी पेढे वाटत आहे. त्यांनी खूप चुकीचे काम केले आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली आहे," असे प्रकाश राजपूत म्हणाले.
मी 1992 ते 2000 सालापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर होतो, असेही ते म्हणाले.