राऊत-फडणवीस भेटीत भविष्यातील राजकीय भूकंपाची नांदी, जाणून घ्या

 या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे भविष्यात बदलू शकतात

Updated: Sep 27, 2020, 05:37 PM IST
राऊत-फडणवीस भेटीत भविष्यातील राजकीय भूकंपाची नांदी, जाणून घ्या  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीसांची सामनासाठी मुलाखत घ्यायची असल्याने राऊत त्यांना भेटल्याचा खुलासा भाजपकडून आणि राऊत यांच्याकडूनही करण्यात आलाय. मात्र या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे भविष्यात बदलू शकतात, हे नाकारता येत नाही. 

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. २०१९ साली विधानसभेच्या निकालानंतर भाजप- शिवसेनेचं सरकार स्थापन होईल अशीच शक्यता होती. मात्र भाजपबरोबर सरकार स्थापन करू नये अशी शिवसेनेत पहिली भूमिका मांडली ती संजय राऊत यांनी, एवढंच नव्हे तर महाविकास आघाडी स्थापन करण्यात आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आणण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. 

सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करतायत, यात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबरच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडलेलं नाही. त्यामुळेच शिवसेनेतील नेत्यांपैकी संजय राऊत हे भाजपच्या लेखी क्रमांक एकचे व्हिलन ठरले आहेत. दुसरीकडे भाजपनेही महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनाला सर्वात जास्त टार्गेट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपच्या कायम निशाण्यावर असतात. एवढंच नव्हे तर सुशांत सिंह प्रकरणात भाजपच्या नेत्यांनी थेट युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

या सगळ्यामुळे शिवसेना - भाजपचे संबंध कायमचे बिघडले होते, या दोन पक्षांचे नेते एकमेकांशी राजकीय मैत्री ठेवतील का? असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला होता. संजय राऊत यांनी घेतलेली भेट ही राज्यात राजकीय भूकंप घडवणारी ठरेल अशी चर्चा होती. मात्र ही भेट सामनाच्या मुलाखतीसंदर्भात झाल्याचे झी २४ तासने सर्वप्रथम समोर आणले. त्यानंतर फडणवीस आणि संजय राऊत यांनीही हाच खुलासा केला.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप, शिवसेनेतेएवढी टोकाची कटुता निर्माण झालेली आहे. तरीही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर कधीही सामना वाचत नसल्याचा दावा करणाऱ्या फडणवीस यांनीही सामनाला मुलाखत देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे ही भेट आणि पुढे होणारी मुलाखत या दोन पक्षातील कटुता कमी करण्यास फायदेशीर ठरणार आहे. आमची भेट काही राजकीय नव्हती. सामनासाठी मुलाखत घेण्यासाठी राऊतांनी विचारणा केली. त्यात माझ्या काही अटी होत्या, ज्या मी त्यांना सांगितल्याचे या भेटीवरील स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय.

आतापर्यंत दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये पूर्ण बंद असलेली चर्चेची दारं यानिमित्ताने खुली झाली आहेत. त्यामुळं भविष्यात शिवसेना भाजपला एकत्र यायचं असेल तर चर्चा करण्याच्या मार्गाची बीजं राऊत - फडणवीस भेटीत पेरली गेली आहेत. या भेटीने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही शिवसेनेने सिग्नल दिला आहे. 

आघाडीत शिवसेनेचा मान राखला गेला नाही, किंवा शिवसेनेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यासाठी भाजपचा पूर्वीचा मार्ग आता खुला असल्याचा इशाराही या भेटीने दिला गेलाय. तर यातून एक तोटाही संभवतो. तो म्हणजे, जर शिवसेना - भाजपची जवळीक वाढली तर राष्ट्रवादीही भाजपशी जवळीक साधू शकते. तेव्हा शिवसेनेला राष्ट्रवादीला दोष देता येणार नाही.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने सध्या राज्याच्या राजकारणात भूकंप होणार नाही. मात्र राजकारणत कुणीही कुणाचा कायमची शत्रू किंवा मित्र नसतो या न्यायाने भविष्यात या भेटीमुळे राजकीय भूकंप होऊ शकतो. राज्याच्या राजकारणात जर शिवसेनेबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, तर भविष्यात भाजप - शिवसेना पुन्हा एकत्र येणारच नाहीत, असं कुणीही ठामपणे सांगू शकणार नाही.