Accused CM Eknath Shinde: मुंबईला ओरबाडण्याचं काम सुरु असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. "मुंबई, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शिवसेनेतून फुटून निघालेले एकनाथ शिंदे वगैरे लोकांना काहीही देणं-घेणं नाही," असं राऊत यांनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
"लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी दिल्लीला महाराष्ट्राचे पाणी दाखवले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काय होईल, हा प्रश्न त्यामुळे निकाली निघाला. दिल्लीत दहा वर्षे मोदी-शहांचे राज्य आहे. त्यामुळे व्यापारी स्वभावानुसार महाराष्ट्रात दलाल आणि लाचारांच्या फौजा त्यांनी उभ्या केल्या. मुंबईचे ओरबाडणे सुरूच आहे. मुंबईची सध्याची अवस्था पाहून पोर्तुगीजकालीन मुंबईची आठवण येते. मुंबईचे वैभव पोर्तुगीजांनी आपल्या शंभर वर्षांच्या कारकीर्दीत साफ नष्ट केले. 1665 साली हम्फ्री कूक याने मुंबई बेट पोर्तुगीजांकडून आपल्या ताब्यात घेतले त्या वेळी मुंबई ही शिलाहारांची वैभवशाली राजधानी राहिली नव्हती. ते यादवांचे नंदनवन राहिले नव्हते. धर्मांधांनी विध्वंस केलेले, पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले ते एक दरिद्री बेट होते. महालक्ष्मी निघून गेल्यानंतर ‘अवदसेची मिरास’ अशी ती भूमी झाली होती. त्या मुंबईस वैभव प्राप्त करून देण्याचे काम पुढे इंग्रजांनी केले व पुढे मराठी माणसांच्या घामातून मुंबईला वैभव प्राप्त झाले. ती मुंबई पुन्हा पोर्तुगीज काळात जाऊन वैभवास मुकणार आहे काय?" असा सवाल राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरातून व्यक्त केला आहे.
"शिवसेनेतून फुटून निघालेले एकनाथ शिंदे वगैरे लोकांना आता मुंबई, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीच देणे-घेणे राहिलेले नाही," असा टोला राऊत यांनी लगावला आहे. “निवडणुका आल्या की शिवसेनेला मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार वगैरेची आठवण येते व ते तशा बोंबा मारतात,” असे मुख्यमंत्री शिंदे सांगतात. त्यांनी असे बोलणे हे फक्त पक्षांतर नसून एक प्रकारे धर्मांतरसुद्धा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मुंबईवर टांगती तलवार आहे व शिंदे-फडणवीसांच्या काळात ही तलवार अधिक धारदार बनून खाली आली आहे. मुंबईचे ओरबडणे सोपे व्हावे म्हणून मुख्यमंत्रीपदी शिंदे यांची नेमणूक सध्याच्या दिल्लीश्वरांनी केली. शिंदे व त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी आहे व हा पैसा त्यांना गुजरातच्या उद्योगपतींकडून मिळतो," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणी
"मंत्रालयातले एक वरिष्ठ अधिकारी दिल्लीत भेटले. “मुख्यमंत्री शिंदे हे एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा करतात व त्या कामांचा आदेश व टेंडर निघण्याआधीच गुजरातच्या ठेकेदारांकडून सरळ 40 टक्के घेतात. काही हजार कोटींची ही उलाढाल सुरू आहे.” पालघर, रायगड, अलिबागसारखा प्रदेश एम.एम.आर.डी.ए.च्या टाचेखाली आणणे हा विकास नसून मुंबईसह अर्धा महाराष्ट्र परप्रांतीय धनिकांना विकण्याचा डाव आहे. मुंबईचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते," असं राऊत यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 8000 कोटी मंजूर... मोदींनी महाराष्ट्रातील 30 KM च्या 'या' रस्त्यासाठी उघडली तिजोरी; संकल्पना गडकरींची!
"मुंबईची हद्द पालघर, अलिबागपुढे वाढवली. यात बिल्डर आणि धनिकांचाच फायदा आहे. मुंबईत आणि समुद्रापलीकडेही मराठी माणूस नाही, हे चित्र ज्यांच्या हृदयास पीडा देत नाही त्यास मराठी माणूस कसे म्हणावे? धारावीच्या निमित्ताने मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळून ढेकर देणाऱ्यांच्या पाठीशी आज महाराष्ट्राचे शासन उभे आहे. कारण लुटीतला वाटा त्यांना मिळतोय. हा वाटा किती? महाराष्ट्रावर सध्या जितके कर्ज आहे तेवढा वाटा मुंबई विकण्याची दलाली करणाऱ्यांना मिळेल," असं राऊत म्हणाले आहेत.