नितीन पाटणकर, प्रतिनिधी, झी मीडिया, पुणे : पुणे महापालिका सध्या मोठमोठ्या घोटाळ्यांनी गाजतेय. पण केवळ कोट्यवधींचे घोटाळेच नाहीत तर छोटे मोठे ठेकेदारही मनपाला गंडवत आहेत. सॅनिटरी नॅपकीन गोळा करणं त्याची विल्हेवाट लावणं याचं काम खासगी ठेकेदाराला देण्यात आलं होतं. सत्तर लाखांच्या या कामात ठेकेदारानं काम न करता खोटी बिलं सादर केल्याचा प्रकार पुढे आलाय.
महापालिका ओला कचरा , सुका कचरा, वैद्यकीय कचरा वेगवेगळा जमा करते आणि त्याची विल्हेवाट लावते. त्याचप्रमाणं सॅनिटरी नॅपकिन गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे आणि जनजागृती करणे यासाठी वेगळं टेंडर काढलं.
गणेश एन्टरप्रायझेस या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं. शाळा, कॉलेज, महिला हॉस्टेल आणि सोसायट्यांमध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन गोळा करायचे. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावायची असं हे सत्तर लाख रुपयांचं हे काम. गणेश एन्टरप्रायजेसने मात्र सॅनिटरी नॅपकिन गोळा केलेच नाहीत. त्यामुळे विल्हेवाट लावायचा प्रश्नच येत नाही. तरीही या कामासाठीची बिलं घेण्यात आली असा आरोप होतोय.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतच ही बनवाबनवी उघड झाली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराची बनावट बिलं थांबवण्यात आली आहेत. गणेश एन्टरप्रायझेसने केलेल्या कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल. त्यानंतरच त्यांची बिलं दिली जातील किंवा कारवाई केली जाईल. अशी माहीती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील साटंलोटं जगजाहीर आहे. मात्र, हा प्रकार काही जागरुग कर्मचाऱ्यांमुळेच उघडकीस आलाय. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आपली जबाबदारी पार पाडावी. आणि महापालिकेला गंडा घालू पाहणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करत त्याला काळ्या यादीत घालावं. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.