सांगली जिल्हा परिषदेत वर्क फ्रॉम होम; नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण

कोरोना नियंत्रण कक्षात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना थेट या विषाणूची लागण झाली. 

Updated: Jul 26, 2020, 11:42 AM IST
सांगली जिल्हा परिषदेत वर्क फ्रॉम होम; नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली: कोरोनाने सांगलीच्या जिल्हास्तरीय कोरोना नियंत्रण कक्षातच प्रवेश केल्याने सांगली जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज तीन दिवसांसाठी घरातून करण्यात येणार आहे. या काळात सांगली जिल्हा परिषदेची इमारतचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४८६६१ नवे रुग्ण; ७०५ जणांचा मृत्यू

कोरोना नियंत्रण कक्षात पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना थेट या विषाणूची लागण झाली. कक्षातील ६० कर्मचारी, अधिकाऱ्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी  १७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर  ४३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

याठिकाणी कार्यरत असणाऱ्या साथरोग अधिकाऱ्यास अगोदरच कोरोनाची लागण झाली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टीचे दिवस आहेत, आणि पुढे सोमवार ते बुधवार तीन दिवस सर्व कामकाज हे कार्यालयातून सुरु राहणार नाही. तथापि या काळात जिल्हा परिषदेकडील संबंधीत कर्मचाऱ्यांनी घरातून काम करावे, अशा सुचना सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. या कालावधीत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीची स्वच्छता केली जाईल.

दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ९२५१ रुग्ण आढळून आले. तर २५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मात्र, काल ७,२२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६,५५ टक्के इतके झाले आहे. ही महाराष्ट्राच्यादृष्टीने जमेची बाब आहे.