बैलाने पाण्यात उडी घेतली अन्... मगरींनी भरलेल्या कृष्णा नदीत सुरु होता जीवघेणा खेळ

Sangli News : सांगलीतल्या कृष्णा नदीत सुरु असलेल्या या पाठशिवणीच्या खेळामुळे अनेकांचा हृदयाचा ठोका नक्कीच चुकला असेल. गावतल्या तरुणांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर बैलाला नदीच्या पाण्याबाहेर आणलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला

आकाश नेटके | Updated: Apr 14, 2023, 04:07 PM IST
बैलाने पाण्यात उडी घेतली अन्... मगरींनी भरलेल्या कृष्णा नदीत सुरु होता जीवघेणा खेळ title=

प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : सांगलीतल्या (Sangli News) कृष्णा नदीत (krishna river) शुक्रवारी मगर आणि बैलाचा चार तास पाठशिवणीचा थरारक खेळ सुरु होता. सांगलीच्या भिलवडी इथं कृष्णा नदीमध्ये मगर आणि बैलामध्ये (Bull) पाठलाग सुरु असल्याचे पाहायला मिळाले. तब्बल चार तास बैल नदीच्या पात्रामध्ये अडकून पडला होता. शेवटी बोटीच्या सहाय्याने बैलाला बाहेर काढण्यात यश आले आहे. गावातल्या अखेर जिगरबाज तरुणांनानी नदीमध्ये उतरून बैलाची मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे.

सांगली जिल्हातील भिलवडी या ठिकाणी साठेनगरमध्ये राहणाऱ्या अक्षय मोरे याने आटपाडीच्या बाजारातून 70 हजार रुपयांना खिलार जातीचा बैल खरेदी करून आणला होता. गावात एवढा महागडा बैल आणत असल्याने अक्षय आणि त्याचा मित्रपरिवार चांगलाच खूश होता. मात्र बैल गावात आणल्यानंतर भलताच प्रकार घडला. अक्षयने हा खरेदी केलेला बैल एका टेम्पोने गावात आणला होता. मात्र टेम्पो गावात आल्यानंतर बैल खाली उतरवत असताना धक्कादायक प्रकार घडला. 

टेम्पो गावात येताच बैल उतरवत असतानाच गाडीचा हॉर्न वाजला. यानंतर बैल सैरभैरा धावू लागला. यानंतर बैलाने जवळच असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली. बैल नदीमध्ये उतरताच नदीच्या पात्रात आसपास असणाऱ्या मगरींचे लक्ष या बैलाकडे गेलं. हा सर्व प्रकार पाहून अक्षय आणि आसपासच्या नागरिकांना धडकी भरली. मग या बैलाला नदीतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केला.

मात्र भीतीने बैलाने नदीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूच्या पात्राकडे पाण्यातून प्रवास सुरू केला. तितक्यात  तीन ते चार मगरी या बैलाचा पाठलाग करु लागल्या. त्यानंतर नदीपात्रामध्ये बैल आणि मगरींच्या थरारक पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. पण मगर जवळ येताच  बैल त्यांना चुकवा देऊन पुढे जायचा. कृष्णा नदीच्या पात्रात तब्बल चार तास हा जीवघेणा खेळ सुरु होता.

दुसऱ्या बाजूला या बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आणि मगरीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी अक्षय व त्याच्या इतर मित्रांनी खूप प्रयत्न केले. त्यानंतर अक्षयने बैलाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नावाडी नितीन गुरव यांना बोलावलं. नितीन गुरव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांना आपल्या बोटीत घेत त्यांनी बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेर अनेक प्रयत्नांनंतर नितीग गुरव यांच्यासह गावातील तरुणांनी मगरींच्या जाळ्यातून बैलाची सुखरुप सुटका केली. बैल पाण्याबाहेर येताच अक्षय आणि त्याच्या मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.