सांगली : वाळू तस्करीतील जप्त केलेले ट्रॅक्टर चोरून नेण्यास मदत केल्याच्या प्रकरणी आटपाडीत नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे असे याचे नाव आहे. याच्यासोबत तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग लांडगे आणि गोदामपाल भारत बल्लारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी तलाठी बजरंग लांडगे आणि गोदामपाल भारत बल्लारी या दोघांना पोलिसांनी अटक केली मात्र नायब तहसीलदार बाळासाहेब सरोदे फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
खांजोडवाडी येथील माणगंगा नदीच्या पात्रात वाळू तस्करी करताना 6 फेब्रुवारी 2019 ला बापू सूर्यवंशी यांचा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडला होता. पथकातील कर्मचाऱ्यांनी हा ट्रॅक्टर शासकीय गोदामाच्या आवारात लावला होता. 17 ऑक्टोबर 2019 रोजी गोदामाच्या आवारातून बापू सूर्यवंशी याने हा ट्रॅक्टर चोरून नेल्याची फिर्याद गोदाम मालक भारत बल्लारी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिली होती.
मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग लांडगे आणि गोदामपाल भारत बल्लारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.