शांतीगिरी महाराजांच्या तीन भक्तांना समाधी... जिवंत की मृत?

हे तीन भक्त वेरूळ इथून आणून त्र्यंबकेश्वरात संशयास्पद समाधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. 

Updated: Jun 5, 2018, 10:58 AM IST

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : त्र्यंबकेश्वरात तीन जणांना समाधी देण्याचा प्रकार घडलाय. निवृत्तीनाथ मंदिरापासून काही अंतरावर हा प्रकार घडलाय. त्यामुळे शहरात सध्या वाद पेटलाय. निवृत्तीनाथ मंदिरापासून थोड्याच अंतरावर शांतीगिरी महाराजांनी त्यांच्या तीन भक्तांना समाधी दिलीय.  हे तीन भक्त वेरूळ इथून आणून त्र्यंबकेश्वरात संशयास्पद समाधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. 

या तीन समाधी निवृत्तीनाथ समाधी मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर आहेत. संपूर्ण वारकरी समाजाला पूजनीय असलेल्या संधी मंदिरापासून दिसणाऱ्या या तीन समाधी भिंत बांधून झाकण्यात आल्या आहेत. ही जागा स्मशानभूमीची नाही, खासगी नाही... ही जागा शांतीगिरी महाराजांच्या आश्रमाची आहे. कोणतीही परवानही न घेता ही समाधी काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री तयार करण्यात आली. ज्यांच्या समाध्या बांधल्या ते समाधी देण्यात आले तेव्हा जिवंत होते की मृत हेही कुणाला माहिती नाही. हा प्रकार उघड झाल्याने जनार्दन महाराजांचे भक्त मंडळी नाराज झालेत. 

जनार्दन महाराजांनी शांतीगिरी महाराजांना वारस नेमलं त्यावेळेपासून त्र्यंबकेश्वरात अनेक वाद झालेत. मौनगिरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शांतिगिरी महाराजांनी या विषयावर बोलण्यास नकार दिलाय. त्यांच्या समर्थक महाराजांनी मात्र सर्वकाही रितसर असल्याचं सांगत दोन जणांना समाधी नियमानुसार दिल्याचं सांगितलंय.  

स्पष्टीकरण देताना दोन समाधी असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र प्रत्यक्षात जागेवर तीन समाधी असल्याने संभ्रम निर्माण झालाय. शांतिगिरी महाराज गेल्यावेळी लोकसभा निवडणूक रिंगणातही उतरले होते. एकूणच त्यांची प्रतिमा ही ग्रामीण भागात संत महात्माची असली तरी हा प्रकार त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.