प्रताप नाईक / प्रणव पोळेकर, झी २४ तास, रत्नागिरी : रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानं झालेल्या दुर्घटनेत ११ जण ठार, तर १३ जण बेपत्ता झालेत. केवळ वीसच वर्षांपूर्वी बांधलेलं हे धरण फुटल्यामुळं आता कंत्राटदार, अधिकारी आणि नेत्यांच्या भ्रष्ट युतीचा मुद्दा पुढं आलाय.
मंगळवारच्या काळ्याकुट्ट अमावस्येची रात्र तिवरे गावातल्या ग्रामस्थांसाठी काळरात्र ठरली. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण फुटल्यामुळं या गावातील अनेक ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले. माणसांसोबत गुरंढोरं आणि संसारही या पाण्यात वाहून गेले. गेली दोन वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, याची कुणीच दखल घेतली नाही. यामुळे, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त गावकऱ्यांनी केलीय.
बुधवारचा दिवस उजाडला आणि या प्रकरणावर हळूहळू प्रकाश पडू लागला. वीस वर्षांपूर्वी बांधलेलं हे धरण डागडुजी न झाल्यामुळं फुटल्याचं सांगत शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केला.
परंतु, लगेचच अधिकाऱ्यांना दोष देणारे शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण हेच या धरणाचे कंत्राटदार असल्याची बाब समोर आली. त्यांच्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीनं हे धरण बांधलं होतं. केवळ २० वर्षांत हे धरण फुटल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. केवळ वीस वर्षांपूर्वी बांधलेलं धरण फुटल्यामुळं कंत्राटदार, नेते आणि अधिकारी यांची भ्रष्ट युती याला जबाबदार असल्याची बाब स्पष्ट होऊ लागली. मग कंत्राटदारांकडून सुरू झाला स्वतःचा बचाव...
किमान १०० वर्षांचा विचार करून धरणं बांधणं अपेक्षित असल्यामुळं वीस वर्षात धरण फुटण्याच्या घटनेला कंत्राटदारच जबाबदार असल्याचं निवृत्त अभियंते विजय पांढरे यांनी स्पष्टपणे म्हटलंय. कोकणातल्या धरणांमध्ये काळ्या मातीचा वापर न केल्याचाही आरोप पांढरे यांनी केलाय.
तर गेल्या वीस वर्षांची ही कथा. या वीस वर्षात एक कंत्राटदार आमदार होतो आणि याच वीस वर्षांत त्यानं बांधलेलं धरण फुटतं. या सगळ्यात बळी जातो तो मात्र सर्वसामान्यांचा... हेच विदारक वास्तव यातून समोर आलंय.