महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा; 'सामना' अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर कडाडून टीका

Saamana Editorial on Shiv Sena Symbol and Shiv Sena Name freeze : महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा, त्यावर त्यांची नातवंडेही थुंकतील असा हल्लाबोल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर करण्यात आला आहे.  

Updated: Oct 11, 2022, 09:10 AM IST
महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा; 'सामना' अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर कडाडून टीका title=

मुंबई : Saamana Editorial on Shiv Sena Symbol and Shiv Sena Name freeze : महाराष्ट्राच्या दुष्मनांचं दफन करा, त्यावर त्यांची नातवंडेही थुंकतील असा हल्लाबोल दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर करण्यात आला आहे. भाजप आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार नामर्द आहेत, त्यांनी मिंधे गटाच्या बृहन्नडा, शिखंडींना पुढे करुन शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला, अशी  कडाडून टीका 'सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. शिवसेना ही शिवरायांचा अंश आहे, त्याचं अस्तित्व कसं मिटवाल असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 

खोक्याच्या चिता, दुष्मनांची थडगी 

भाजप आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार नामर्द आहेत. मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला गेला आहे. शिवसेना ही खोकेवाल्यांसारखी विकाऊ संघटना नाही. अनेक शिंदे मिंधे येत जात असतात. मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. जनतेने खोक्याच्या चिंता पेटवल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद आहे. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, अशी कडाडून टीका 'सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. 

सत्याला आणि खुनाला वाचा फुटतेच असे म्हणतात, पण मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राचे मन पेटून उठले असताना मिंधे गटाचे प्रवक्ते व राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य व न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. जगात न्याय आहे, असे केसरकरांसारख्या बाजारबुणग्यास वाटणे साहजिकच आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरुन हे महाशय शिवसेनेत आले आणि मंत्रीपदाचे गाजर दिसताच मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनालाही शिवणार नाही, असे म्हटले आहे.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत, म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. आम्ही सांगितले, मुंबई महाराष्ट्राची व महाराष्ट्र देशाचा आहे. मुंबईवर ताबा मिळविण्यापेक्षा चीनने गिळलेल्या लडाख, अरुणाचल प्रदेशातील जमिनीवर ताबा मिळवा.  मुंबई देशाचे पोट आणि तिजोरी भरतच आहे. मुंबईचे काय घेऊन बसलात? आधी पाकव्याप्त कश्मीरचा ताबा घेऊन वीर सावरकरांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करा. तुम्हाला शिवसेनेचा पराभव करता येणार नाही. जनतेचे विराट सैन्य आमच्या पाठीशी आहे. पण त्यांची समोरासमोर लढण्याची हिंमत झालीच नाही. त्यांनी मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करुन शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला. महाराष्ट्र त्यामुळे आकांत करीत आहे. याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली, पण ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही. 

शिवसेना म्हणजे सर्वच राजकीय पक्षांतील मराठी जनांची माऊली आहे. त्या माऊलीवर हात टाकण्याचे व्यभिचारी कृत्य ज्यांनी केले त्यांना महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे तळतळाट लागून, त्यांचा राजकीय निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही, असा संताप महाराष्ट्राच्या घराघरांतून व्यक्त होत आहे. केंद्रीय संस्था आणि यंत्रणा दिल्लीतील सत्ताधाऱयांच्या गुलाम बनल्या आहेत. समोरुन लढण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यासाठी ते निवडणूक आयोगासारख्या यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहेत. शिवसेनेचे म्हणणे सोपे आणि कायद्याला धरुन होते. अंधेरीला विधानसभेची पोटनिवडणूक आहे. त्या निवडणुकीत भाजपचे ‘रडके’ मिंधे गट निवडणूक लढविणार नाहीत. त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत इतक्या घाईने निर्णय घेण्याची गरज नाही. अंधेरी निवडणूक शिवसेनेस धनुष्यबाण चिन्हावर लढू द्या, ही सरळ मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावलीच, पण ‘शिवसेना’ हे नावदेखील वापरु नका, असा बंदीहुकूम लादला. निवडणूक आयोगाच्या राजकीय बापांना वाटत असेल, या अरेरावीमुळे शिवसेनेचा पराभव करता येईल. शिवसेना खचून जाईल. छे, छे! शिवसेना ही काही तुमच्या खोकेवाल्यांसारखी विकाऊ संघटना नाही. स्वाभिमानाच्या मजबूत पायावर ती 56 वर्षांपासून न डगमगता उभी आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

अनेक वादळे आणि घाव झेलून तिने झंझावात कायम ठेवला आहे. शिवसेना संपवू अशी स्वप्ने पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचून शिवसेनेने अनेक अग्निपरीक्षा पार केल्या आहेत. शिवसेना हा एक चमत्कार आहे. ईश्वरी अवताराचा अंश आहे. भगवान शंकराने हलाहल प्राशन करताना एक थेंब पृथ्वीवर पडला. त्या थेंबातूनच जणू शिवसेनेचा अग्नी प्रकट झाला. त्यामुळे सर्व प्रकारचे हलाहल पचवून शिवसेना खंबीरपणे उभी आहे. ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार आहे. असे अनेक शिंदे व मिंधे येत-जात असतात. गद्दारांना इतिहासात कधीच स्थान नसते. पोवाडे मर्दांचे व स्वाभिमान्यांचे गायले जातात. खोकेबाज मिंध्यांवर लोक थुंकतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या बाबतीत त्यांची नीच खेळी केली. आता पुढे काय? सत्तेचा गैरवापर, पैशांचा मस्तवाल वापर करून तुम्ही जे केलेत ते शेवटचे टोक. त्या टोकावर आज शिवसेना आहे व भरारी घेण्यासाठी संपूर्ण आकाश मोकळे आहे. जणू शिवसेनेचा पुनर्जन्मच होताना आम्ही पाहत आहोत. येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे! त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार?, असा सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.