जयेश जगड, झी मीडिया, अकोला : मृत्यू झालेल्या युवकाला जीवनदान मिळाल्याची अंधश्रद्धेला (Superstition) वाव देणारी घटना अकोला (Akola) जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा या गावात घडलीय. प्रशांत मेसरे अस या युवकाच नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्याच्यावर डॉक्टरांकडे उपचार देखील सुरु होते. त्यासोबत त्याच्यावर गावातील एका 21 वर्षीय कथित बाबाकडून सुद्धा उपचार सुरू होते. प्रशांत हा चान्नी पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून सुद्धा कार्यरत होता.
नेमकं काय घडलं?
प्रशांतच्या कुटुंबियांना त्याच्यावर कोणीतरी काळी जादू केल्याचा संशय होता. बुधवारी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील अमरापुर येथील एका देवस्थानावर प्रशांतला दर्शनासाठी नेले होते. तेथे प्रशांची प्रकृती बिघडली त्यामुळे जवळच असलेल्या खामगाव येथील एका डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी करून एक-दोन सलाईन दिल्यावर प्रशांत हा ठीक होईल असं म्हटलं. यानंतर आम्हाला अकोला जवळ असल्याचे सांगत प्रशांतच्या घरच्यांनी त्याला सरळ मुळगाव विवरा येथे आणलं.
त्यानंतर दुपारी अचानक प्रशांतने हालचाल करणे बंद केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा त्याच्या घरच्यांनी सांगितले. प्रशांतच्या मृत्यूची बातमी समजतात त्याच्या घरी लोकांची गर्दी जमा होऊ लागली आणि गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. तिरडी बांधून सरणाकडे नेत असतांना प्रशांतला गावातील बाबाकडे नेण्यात आलं. त्यानंतर बाबाने मंत्र उपचार सुरू केले आणि काही वेळात प्रशांत उठून बसला. यानंतर बाबांनी चमत्कार करून प्रशांतला जिवंत केलं अशी चर्चा गावात पसरली.
पोलिसांनी उघडकीस आणलं संपूर्ण प्रकरण..
चान्नी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गणेश महाजन यांना याप्रकरणी संशय आला आणि त्यांनी गावात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रश्न उपस्थित करताच प्रशांत आणि त्याच्या घरच्यांकडे याची उत्तर नव्हती. चान्नी पोलिसांनी प्रशांत आणि त्याच्या घरच्यांसह बाबाला पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यांना डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केलं याचा पुरावा मागितला. ते पुरावा सादर करू शकले नाहीत. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.