नवी मुंबई : एकीकडे राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला आहे तर दुसरीकडे महागाईचे चटके बसत आहेत. रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले असून, कांदा, टोमॅटो सारखे भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्याचप्रमाणे डाळीचे भाव गेल्या महिन्यापेक्षा दहा रुपयांनी जास्त वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला याचा फटका बसत आहे. नवी मुंबईमधील मुबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटोला किलोमागे 30 ते 32 रुपये मोजावे लागत आहेत. मागील महिन्यात टोमॅटोचे भाव 22 ते 25 रुपये किलोपर्यंत होता. हेच टोमॅटो किरकोळ बाजारात 60 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर कांदा घाऊक बाजारात 15 रुपये किलो दराने तर किरकोळ बाजारात 22 ते 25 रुपये किलोला दर आहे.
तसेच डाळीचे भाव देखील वाढले असून गेल्या महिन्यात 65 रुपये किलो असलेली मुगडाळ आता 75 रुपये किलो घाऊक बाजारात झाली आहे. तर किरकोळ बाजारात ही डाळ 82 ते 85 रुपयांवर पोहोचली आहे. तूरडाळीचा दर मागील महिन्यात 72 ते 75 रुपये होता. तो या महिन्यात 82 रुपयापर्यंत आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ 90 रुपये किलो या दराने विकली जात आहे. उडीद डाळीने शतक गाठले आहे. 100 रुपये किलोला दर मोजावा लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
जीवनावश्यक वस्तूचे वाढलेले दर चढचे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाऊस पडल्यानंतर नवीन पीक येईपर्यंत चढे राहणार असल्याचे बोलले जात आहे. पाऊस चांगला झाला तर ही महागाई कमी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तोपर्यंत महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.