'नीट'चा हा भोंगळ कारभार, लाखो विद्यार्थ्यांना फटका

 केमेस्ट्रीच्या एका प्रश्नाचे उत्तर चूक दाखविण्यात आलं आहे.

Updated: Jun 5, 2019, 07:50 PM IST
'नीट'चा हा भोंगळ कारभार, लाखो विद्यार्थ्यांना फटका  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : राष्ट्रीय वैद्यकीय पूर्व परीक्षा अर्थात नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. ज्यात केमेस्ट्रीच्या एका प्रश्नाचे उत्तर चूक दाखविण्यात आलं आहे. मुळात एनसीईआरटीच्या केमेस्ट्रीच्या पुस्तकात त्याच प्रश्नाचे उत्तर बरोबर असताना नीटचा हा भोंगळ कारभार उजेडात आला आहे. त्यामुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना ०५ गुणांचा तोटा होणार असून अनेक विद्यार्थी हे वैद्यकीय प्रवेशापासून किंवा चांगल्या कॉलेजपासून वंचित राहू शकतात. आता विद्यार्थी-पालक-शिक्षक याविषयी न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. 

डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय वैद्यकीय पूर्व परीक्षा अर्थात नीट परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यावेळी नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग अकॅडमीने या परीक्षेच्या उत्तरांची यादीही प्रसिद्ध केली. मात्र या यादीत केमेस्ट्री अर्थात रसायनशास्त्राच्या पी ०४ सेट मधील १६३ क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर हे चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी केमेस्ट्रीचे लातूर शहरातील प्रसिद्ध प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्याकडे जाऊन याची पडताळणी केली असता नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग अकॅडमीचे उत्तर चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी प्राध्यापकांनी एनसीईआरटीच्या केमेस्ट्रीचे पुस्तकातही पडताळून पाहिल्यानंतर उत्तर चुकीचे असल्याचेच स्पष्ट झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ०५ गुणांचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश किंवा चांगल्या शासकीय-खाजगी कॉलेजपासून वंचित राहावे लागेल. 

तर विद्यार्थी आणि पालकांनीही नीट परीक्षेच्या या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीची चूक हे विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब करण्याचा प्रकार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे ०५ गुण नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग अकॅडमीने बहाल करावेत अशी मागणी करीत याविरोधात न्यायायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थी आणि प्रा. मोटेगावकर यांनी दिलाय. 

एकूणच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गेली ०२-०२ वर्षे दिवसरात्र मेहनत केलेली असते. त्यात परीक्षा घेणारेच अशा पद्धतीने उत्तर चुकवीत असतील तर 'नीट' परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग अकॅडमीच्या संबंधित विषयाच्या जबाबदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान टाळून त्यांना हे गुण बहाल करणेही गरजेचे आहे.