महानंद प्रकल्प गुजरातकडे जाण्याचा मार्ग मोकळा; विखे पाटील म्हणतात, 'डोक्यावर परिणाम झालाय'

Mahanand Milk : महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

आकाश नेटके | Updated: Feb 22, 2024, 10:24 AM IST
महानंद प्रकल्प गुजरातकडे जाण्याचा मार्ग मोकळा; विखे पाटील म्हणतात, 'डोक्यावर परिणाम झालाय' title=

Mahanand Milk : महाराष्ट्र सरकार महानंदचे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (NDDB) हस्तांतरण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. दुसरीकडे महानंद डेअरी एनडीडीबीकडे देऊन या प्रकल्पाची सूत्रे गुजरातच्या हातात द्यायचा घाट घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

"महाराष्ट्रातल्या संस्था, उद्योग गुजरातला वळवल्या जात आहेत. उद्या मुंबईसुद्धा गुजरातला देतील. महानंदाचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटलांचे मेहुणे होते. तिथे शेकडो कर्मचारी आहेत. विखे पाटलांच्या मेहुण्यांनी काय केलं? तुम्हा महाराष्ट्र सरकारची एक डेअरी चालवू शकत नाही. स्वतःच्या डेअरी बरोबर सुरु आहेत," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महानंदा महाराष्ट्रातच राहणार - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानंदच्या हस्तांतरण प्रक्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. "महानंद हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक होणार आहे. पूर्वीच्या लोकांच्या गलथान कारभारामुळे कामगारांचा प्रलंबित पगार देण्यात येणार आहे. यासोबत 500 कामगारांना व्हीआरएस देण्याची प्रक्रियेवर बैठकीत चर्चा होणार आहे. जळगाव दूध संघ देखील हस्तांतरित करण्यात आला होता तो आता नफ्यात आल्यावर परत मिळालाय. गुजरातला प्रकल्प देत असल्याची आमच्यावर टीका होतेय. मात्र राज्यातील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय. माहिती न घेता आरोप करण्याची ही पद्धत आहे. महानंदा महाराष्ट्रातच राहणार आहे. फक्त आज अडचणीत सापडली आहे. म्हणून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक बोलवण्यात आली आहे. आधी कामगारांचा प्रश्न आपण सोडवू," अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

महानंदाच्या संचालक मंडळाचा राजीनामा

अखेर महानंदाच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. महानंदाचे चेरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संचालक मंडळाने राजीनाम्याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांदकडे पाठवण्यात आलं आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले तर राजकारणातून निवृत्ती घेईल आणि जर आरोप सिद्ध न झाल्यास संजय राऊत यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे आव्हान राजेश पराजणे यांनी केले आहे.