मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानी, बांगलादेश घुसखोरांविरोधात मोर्चा काढला. सीएए आणि एनआरसीला यावेळी त्यांनी ठाम पाठींबा दिला. यानंतर राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोक राज ठाकरे यांना गांभीर्याने घेतील अस वाटत नसल्याचे आनंदराज आंबेडकर म्हणाले.
राज ठाकरेंची एक भूमिका कधी कायम नसते. कधी ते सरकार सोबत असतात तर कधी विरोधात असतात असा टोला आंबेडकरांनी लगावला. आज देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. बेरोजगारी वाढत आहे. या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले.
मनसेच्या या शक्तीप्रदर्शनाबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही थेट भाष्य करणे टाळले. मात्र, आमचे हिंदुत्व शुद्ध आहे. त्यामुळे आम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगाला माहिती आहे, असेही उद्धव यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या वक्तव्यावरून राज यांना चिमटा काढला. आपल्याकडे लोकशाही आहे. तसेच तलवार वैगेर काढण्याची भाषा जुनी झाली. आता फार नवीन शस्त्रे आली आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले.