तरुणीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा रास्तारोको, आरोपीला स्वाधीन करण्याची मागणी

दारोडा गावात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Updated: Feb 10, 2020, 12:32 PM IST
तरुणीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा रास्तारोको, आरोपीला स्वाधीन करण्याची मागणी  title=

वर्धा : हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला आमच्या स्वाधीन करा, त्याला गावातच आणा अशी उद्विग्न भावना दारोडा गावातल्या नागरिकांनी व्यक्त केली. आरोपीला गावात आणल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नसल्याचंही ग्रामस्थ सांगत आहेत. दारोडा गावात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी काल नागरिकांनी मुंडण आंदोलन केलं होतं.

हिंगणघाटच्या घटनेच्या खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलीय. तसंच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांना हा खटला चालवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हिंगणघाट जळीतकांडातल्या पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारनं कडक कायदा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा केल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. तर कठोर कायद्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही सांगितलं आहे.

जळीतकांडाची घटना घडल्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त झाला होता. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर आता महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जळीतकांडासारख्या घटना कधी थांबणार? मुलींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन कधी बदलणार ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

जळीतकांडाची घटना घडल्यापासून ते पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर एकच गोष्ट वारंवार समोर येतेय ती म्हणजे या नराधमांची हिंमत होते तरी कशी. गुन्हेगारांना कायद्याची जरब कधी बसणार? सरकार काय पाऊल उचलणार ? हे प्रश्न पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत.