कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा, खरेदी आता एक शेतकरी एक वाहन पद्धतीने

कापूस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवस कापसाची खरेदी होत नव्हती. त्यामुळे कापूस शेतकरी चिंतेत होता.  

Updated: May 12, 2020, 03:43 PM IST
कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा, खरेदी आता एक शेतकरी एक वाहन पद्धतीने   title=
छाया सौजन्य - Sanjay Rathod | Facebook

यवतमाळ : कापूस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवस कापसाची खरेदी होत नव्हती. त्यामुळे कापूस शेतकरी चिंतेत होता. आता यवतमाळ जिल्ह्यात शासनाच्यावतीने कापूस खरेदीला सुरवात झाली आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यास विलंब होत आहे. याची दखल घेऊन आता एक शेतकरी, एक टोकन आणि एक वाहन या पध्दतीने कापूस खरेदी करण्यात येईल, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

शासनाद्वारे सीसीआय व कॉटन फेडरेशनमार्फत कापूस खरेदी सुरु आहे. कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विलंब होत आहे. यासंदर्भात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस शासनामार्फत खरेदी होण्याच्या दृष्टीने एक शेतकरी एक टोकन व एक वाहन अशा प्रकारचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या निर्णयानुसार कापूस मर्यादा २५ क्विंटल प्रति वाहन ठेवण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून त्यांना पुढील हंगामाकरिता आर्थिक सहाय्यता उपलब्ध होणार आहे. या पद्धतीने कापूस खरेदीकरिता शेतकरी कुटुंबातील एक वाहन स्वीकृत करण्यात येईल. कापूस विक्रीचे वेळी शेतकऱ्यांनी स्वत: अथवा कुटुंबातील व्यक्तींनी आधार कार्ड किंवा ओळखपत्रासह हजर राहावे, असेही कळविण्यात आले आहे.

आज १२ मे २०२० पासून एक शेतकरी एक टोकन आणि एक वाहन पद्धतीने कापूस खरेदी सुरु झाली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहील त्यांनीसुध्दा शिल्लक राहिलेला कापूस दिनांक २३ मे २०२० नंतरच्या दुसऱ्या फेरीत विक्रीकरिता नियोजन करून आणावा. यासाठी तेच टोकन उपयुक्त राहणार आहे. त्यावेळेस अशा प्रकारची मर्यादा राहणार नाही. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतमाल दिलेल्या मर्यादेनुसार खरेदी केंद्रावर विक्रीकरिता घेऊन जावा, असे आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.