सांगली : कोरोना रूग्ण संख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. पंधरापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड झोन मधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजेच भगव्या पट्ट्यातील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे हरित पट्ट्यात समाविष्ट होतील.
या भगव्या आणि हिरव्या पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यापार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. मात्र सांगली जिल्ह्यात २६ पैकी २५ रुग्ण करोना मुक्त झाल्यामुळे सांगली जिल्ह्याचा रेड झोन मध्ये समावेश करण्यात येऊ नये आणि सांगलीकरांना थोडी शिथिलता द्यावी अशी प्रतिक्रिया सांगलीकर व्यक्त करत आहेत. रेड झोन मुळे सांगलीकर नाराज आहेत.
सांगलीने खूप चांगल्यापद्धतीने कोरोनावर मात केली. २६ रूग्णांपैकी २५ रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २६ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी गुरुवारी २४ रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली होती. सांगलीत कोरोनाचा फैलाव रोखण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह आरोग्य पथकाचे कौतुक केले आहे.
सांगली जिल्ह्यात अचानक कोरोनाचा फैलाव झाल्याने राज्य सरकारने ठोस पावले उचलली होती. इस्लामपूरमध्ये २५ जण कोरोना बाधित होते. त्याआधी इस्लामपूरमध्ये कोरोनाचे चौदा रुग्ण बरे होऊन स्वगृही परतले होते. दरम्यान, जिल्ह्यातील कोविड-१९ ग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुंबईतील ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची राज्य शासनाकडून नियुक्ती केली होती.
डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने तातडीने सांगलीतील परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यात यश आणले आहे. या समितीने नियोजनाचे काम २८ मार्च रोजी हाती घेतले होते.