मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया

मुंबईत मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी मराठी लोकांना जागा देत नाही म्हणून सांगितलं गेले. यावर आता राजकीय नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Sep 27, 2023, 11:22 PM IST
मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती मात्र आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असं या सोसायटीमार्फत महिलेला सांगण्यात आलं. लेखी द्या असं या महिलेने सांगितल्यानंतर या महिलेसोबत सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची भाषा सुरू केली आणि हुज्जत घातली.. या महिलेनं घडलेला प्रकार फेसबुकवर व्हिडीओद्वारे शेअर केलाय आता यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

आदित्य ठाकरे

चीड आणणारी घटना… 
पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? 
आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या… 
तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार?  ह्या बिल्डींगवर कारवाई होणार का?  उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की ‘थॅंक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार?  हिम्मत करा!  कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा! महाराष्ट्र बघतोय!  अतिशय संतप्त करणारी ही घटना! असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. 

नाना पटोले

मुंबई मध्ये आता मराठी माणसाला च जागा नाही ?? आज मुलुंड मुंबई येथे एका मराठी भगिनी बाबतीत झालेला प्रकार हा अतिशय संतापजनक आहे. Maharashtrian Not Allowed अशी मुजोरी काही मंडळी येथे मुंबई मध्ये करत आहेत हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत हे बघितले पाहिजे,केंद्रातील भाजपा सरकार मुंबई मराठी माणसापासून परिणामी महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करत आहे. राज्यातील येड्याचे सरकार हे दिल्लीश्वरा समोर झुकलेले आहे. मराठी स्वाभिमान जागृत ठेवून राज्य सरकारने या घटनेची चौकशी करावी आणि अश्या घटना परत घडू नये याची काळजी घ्यावी.

अशोक चव्हाण

ही घटना अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात मराठी माणसालाच Maharashtrians are not allowed म्हणून मुजोरी केली जाणार असेल तर ते सहन करता कामा नये. राज्य सरकारने तातडीने चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार 

अशा पद्धतीने हे अजिबात चालणार नाही. कुणाची मक्तेदारी चालू देणार नाही आणि सहनही करणार नाही. माहिती घेतली जाईल या घटनेची. जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेवू. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचा कदापि धाडस होणार नाही अशी भूमिका घेवू. महाराजांच्या भूमीत हे घडत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

विजय वडेट्टीवार

मुंबईतून महाराष्ट्र हळू हळू वजा कसा करण्यात येत आहे त्याचे हे आजचे प्रकरण उत्तम उदाहरण आहे.  जी मुंबई मराठी माणसांची आहे तिथे त्यांनाच जागा नाही असे म्हणत मराठी माणसांचा द्वेष करणारे कोण आहेत?  भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एका विशिष्ठ धर्मातील लोकांबद्दल असलेला द्वेष आपण मागील आठवड्यात एका भाजप खासदाराच्या भाषेतून बघितला. हा द्वेष आता मराठी माणसाकडे यायला लागला का ?  जात- पात,धर्म,भाषेला पकडून जो द्वेष पसरवण्यात येत आहे तो थांबला पाहिजे.  महायुती सरकारने कोणत्याही वोट बँकेची चिंता न करता सबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी ही आमची मागणी आहे.