मुंबई : स्वातंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येवर महाराष्ट्राने एक अभूतपूर्व रेकॉर्ड केला आहे. शनिवारी राज्याने लसीकरण मोहिमेत विक्रम नोंदवला आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत नऊ लाख 36 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची ही आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या कामासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचं अभिनंदन केलंय.
कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात महत्वाचं मानलं जातंय. जर लसीकरणाचा साठा राज्याकडे योग्य प्रमाणात राहिला तर त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने लोकांना लसीकरण करता येईल. महाराष्ट्रात एका दिवसात सुमारे 10 लाख लोकांना लसीकरण करण्याची क्षमता आहे. हा दावा खरा आहे, हे शनिवारी झालेल्या लसीकरणाने सिद्ध झाले. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, या नंतरही राज्याचा आरोग्य विभाग त्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी प्रयत्न करत राहील.
तर मुंबईत शनिवारी 2 लाख 19 हजार 727 इतकं लसीकरण झालं. पहिल्यांदाच मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं. तर राज्यात 9 लाख 36 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीव व्यास यांनी ही माहिती दिली आहे.
यापूर्वी 3 जुलै रोजी 8 लाख 11 हजार लोकांना लसीकरण करण्यात आलं होतें. शनिवारी महाराष्ट्राने लसीकरणात पुन्हा एकदा सर्वोच्च आकडा गाठण्याचं काम केलं आहे.
देशात 16 जानेवारीपासून आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरूवात झाली होती. यानंतर1 मार्च पासून 60 वर्षांवरील तसंच 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि गंभीर आजार असलेल्या लोकांचं लसीकरण सुरू झालं होतं. तर 1 एप्रिलपासून, 45 वर्षांवरील सर्व लोकांना लस मिळू लागली आणि 1 मे पासून सरकारने 18 वर्षांवरील सर्व लोकांना लसीकरण करण्यास सुरुवात केली