विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?

मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या..  मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय

वनिता कांबळे | Updated: Jun 12, 2024, 11:10 PM IST
विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र? title=

Vidhan Parishad Election 2024:   विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांनी महायुती आणि मविआमध्ये टेंशन वाढवलंय.. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीला बंड थोपवण्यात यश मिळालंय. मात्र नाशिकमध्ये महायुतीतली बंडखोरी कायम आहे.. 

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांनी महायुती आणि मविआमध्ये टेंशन वाढवलंय.. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीला बंड थोपवण्यात यश मिळालंय. मात्र नाशिकमध्ये महायुतीतली बंडखोरी कायम आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या किशोर दराडेंना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे.  किशोर दराडेंना अजित पवार पक्षाच्या महेंद्र भावसार आणि मुळचे भाजपचे असणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे या बंडखोरांचं आव्हान आहे.  दुसरीकडे मविआला बंडखोरांची मनधरणी करण्यात यश. काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेत शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा दिला आहे.  ठाकरे गटाचे संदीप गुळवे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत.  मुंबईत मात्र मविआ आणि महायुती या दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागलाय. 

मविआमधील दोन पक्षच एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाकडून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर,  लोकसभेत मविआला पाठिंबा देणा-या शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपकडून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  तर अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडेसुद्धा रिंगणात उतरलेत

कोकण आणि मुंबई पदवीधरमध्ये मात्र महायुती आणि मविआमध्ये थेट सामना होणार आहे. मुंबई पदवीधरमधून शिवसेना शिंदेंच्या दीपक सावंत यांनी अर्ज मागे घेतलाय. तर कोकण पदवीधरमधून मनसेच्या अभिजीत पानसेंनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे अनिल परब  विरूद्ध भाजपचे किरण शेलार असा सामना रंगणार आहे.  कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे  रमेश कीर विरूद्ध भाजपचे निरंजन डावखरे अशी लढत आहे. 

विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत.. तेव्हा त्याआधी होणा-या विधानपरिषद निवडणुका म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी रंगीत तालीम ठरणार आहे. अशावेळी दोघांनाही बंडखोरी निश्चितच परवडणारी नाही.