पुणे: सरकारने चर्चेला निमंत्रण दिले आहे आणि आपण चर्चेला नकार दिला आहे, असे आजवर कधीच झाले नाही. आताही दूध दरवाढीच्या मुद्द्यावर सरकारसोबत चर्चेला तयार आहे. पण, सरकारकडून चर्चेचा प्रस्तावच आला नसल्याचा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच, दूध दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चेला तयार आहोत. पण, ज्यांना ही चर्चा करण्याचे अधिकार आहेत अशांसोबतच चर्चा केली जाईल. या चर्चेत अधिकार नसलेल्या लुंग्यासुंग्यांची लूडबूड नको, असेही शेट्टी या वेळी म्हणाले.
दूध दरवाढीच्या मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार आहे. पण, राजू शेट्टींचीच चर्चेसाठी तयारी नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या पार्श्वभूमिवर राजू शेट्टी प्रसारमाध्यमांशी पुणे येथे बोलत होते. जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि पुण्यात मानाचा समजल्या जाणाऱ्या दगडूशेट हलवाई गणपतीला शेट्टी यांनी सोमवारी (१६ जुलै) दुग्धाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राजु शेट्टी यांनी दगडूशेठ गणपती मंदिरात गणपतीची आरती करून गणेश मूर्तीला दुधाचा अभिषेक घातला. त्यांनंतर दूध दरवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं त्यांनी गणपतीला घातलं. मुख्यमंत्री चर्चेला तयार असले, तरी त्यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत आलेलाच नसल्याचं शेट्टींनी म्हटलंय. शिवाय थेट अनुदान दिल्यास गैरव्यवहार होण्याची मुख्यमंत्र्यांनी वर्तवलेली शक्यताही शेट्टींनी फेटाळून लावली.