उद्धव ठाकरे चिल्लरवाला गडी तर पवार कुणाची औलाद? खोतांची जीभ घसरली...

जालन्यातील सभेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री हे चिल्लरवाला गडी आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भरसभेत टीका केली. 

Updated: May 11, 2022, 06:00 PM IST
उद्धव ठाकरे चिल्लरवाला गडी तर पवार कुणाची औलाद? खोतांची जीभ घसरली... title=

जालना : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी 'जागर शेतकऱ्यांचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा' नावाने यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रभर चालणारी ही यात्रा जालना जिल्ह्यात पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा राज्यव्यापी दौरा असल्याचं म्हणत महाविकास आघाडीवर सदाभाऊ खोत जोरदार टीका करत आहेत. जालन्यातील सभेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री हे चिल्लरवाला गडी आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भरसभेत टीका केली. तर पवार कोणाची औलाद हे महाराष्ट्राला कळू द्या असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवरही हल्लाबोल केलाय. 

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

'आमचं सरकार सत्तेवर आलं शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार भरणार, तरुणाच्या हाताला काम देणार, 300 यूनिट वीज मोफत देणार असं शिवसेनेच्या जाहीरनाम्यात होतं. आता तुमचं सरकार सत्तेत आलं 10 हजार मिळाले नाहीत, 300 यूनिट फुकट मिळालं नाही परंतु वीजेची कनेक्शन मात्र कट करायला लागलात. राष्ट्रवादीचा जाहीरनामा काय होता.., आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार, शेतकऱ्याला वीज फुकट देणार, एसटीच विलिनीकरण करणार. अजितदादा बोलताना म्हटले होते जर हे आम्ही नाही केलं तर पवाराची औलाद सांगणार नाय, पवाराचं आडनाव लावणार नाय. मला आता प्रश्न विचारायचाय तुमची औलाद कोणती? हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या...' असं सदाभाऊ खोत जालन्यातील सभेत म्हणाले. 

सदाभाऊ खोत यांनी याचं सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिल्लरवाला गडी असं म्हटलं. सदाभाऊ खोत म्हणाले, 'मुख्यमंत्री असून नसल्यासारखे. त्या बिचाऱ्याला अधिकार काय नाय. एका बाजूला काँग्रेसवाले तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीवाले आहेत. ते जरा चूळबूळ करायला लागलं की म्हणत्यात खाली यायचं नाय, याद राख तिथंच बसायचं आणि पवारसाहेब हुशार आहेत; त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त पैसे हाना ते जरा दंगा करायला लागलं की त्याच्या अंगावर चिल्लर टाका. कारण पवाराला माहित आहे की तो चिल्लरवरचा गडी आहे. त्याला लय द्यावं लागत नाय. तो चिल्लर खातंय आणि हे नोटा खातंय असा कारभार महाराष्ट्रात सुरु आहे.'