Raksha Khadse vs Shriram Patil, Raver Loksabha : रावेर... जळगाव जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ... संत मुक्ताबाई देवस्थान, भुसावळ रेल्वे स्थानक, दीपनगर औष्णिक वीज केंद्र, वरणगाव आयुध निर्माण फॅक्टरी याच मतदारसंघात येतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरेंचं भादली हे जन्मगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरींची असोदा हे माहेर याच मतदारसंघात आहे. रावेर म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. कारण भरीत भाकरीसाठी वापरली जाणारी वांगी इथंच पिकतात. केळी उद्योगाचं हे महत्त्वाचं केंद्र... मराठीसोबतच इथं लेवी बोली बोलली जाते. सत्ताधारी भाजपचा बालेकिल्ला असूनही रावेरमधील अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत.
रावेरच्या समस्या काय?
केळी हे इथलं प्रमुख पीक... मात्र इथं केळी प्रक्रिया उद्योग नाहीत. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. उद्योगधंदे, दळणवळणाची साधने, सिंचनाचे मोठे प्रकल्प रखडलेले आहेत. 2009 मध्ये रावेर हा नवा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून इथं भाजपचं कमळच फुललंय. त्यामुळे आता जनता कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
रावेरचं राजकीय गणित
2009 मध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी राष्ट्रवादीच्या भय्यासाहेब पाटलांचा पराभव केला. 2014 मध्ये भाजपनं खडसेंची सूनबाई रक्षा खडसे यांना मैदानात उतरवलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांना हरवून लोकसभेत प्रवेश केला. 2019 मध्ये रक्षा खडसे दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटलांना पराभूत केलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 2, काँग्रेसचे 2, शिवसेनेचा 1 आणि अपक्ष 1 आमदार आहे.
विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी भाजपनं रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा संधी दिलीय. रावेरमध्ये लेवा समाजाचा मोठा प्रभाव आहे. एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतणार असल्याने रक्षा खडसेंची ताकद आणखी वाढलीय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिलीय. वंचित बहुजन आघाडीनं संजय ब्राह्मणे यांना तिकीट दिल्यानं चुरस आणखी वाढलीय.
पंतप्रधान मोदींची वाढती लोकप्रियता, लेवा पाटील आणि मराठा समाजाचा पाठिंबा, एकनाथ खडसेंची घरवापसी, गिरीश महाजनांचा पाठिंबा या बाबी रक्षा खडसेंच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील कशी टक्कर देतात, यावर निकालाचं गणित अवलंबून असणार आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतले तरीही पडद्याआड खडसे विरुद्ध खडसे सामना आहे. रक्षा खडसेंच्या नणंदबाई रोहिणी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. भावजयीविरोधात त्या किती जोर लावतात, हे पाहणंही रावेरमध्ये इंटरेस्टिंग ठरणार आहे.