मुंबई / रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जळपास ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयातील सिग्नल आणि संपर्क विभागातील कर्मचाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. रत्नागिरी येथील सुमारे ३० कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
५० वर्षी कर्मचारी ९ जून रोजी रोहा तसेच कोलाड येथे येऊन गेला होता. त्यावेळी रत्नागिरी येथूनही कर्मचारीही गेले होते. काही कर्मचाऱ्यांनी एकत्र जेवण घेतले होते. दरम्यान, निधन झालेल्या कर्मचाऱ्याला काही दिवस ताप आला होता. मात्र, ही बाब त्याने कोणाला सांगितलेली नाही, असे त्याच्या संपर्कात आलेल्यांपैकी काहींनी सांगितली. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.
दरम्यान, ५० वर्षी कर्मचारी हा मुंबईत परतल्यानंतर १३ जून रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर कोकण रेल्वेने कर्मचाऱ्याच्या संपर्कातील सर्वांची यादी तयार करत त्यांना रत्नागिरी येथे क्वारंटाईन करून ठेवले आहे. त्यांची संख्या ५० ते ५२च्या घरात आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून आणखी १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४३१ झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रुग्ण कळंबणीतील असून तीन रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील तर एक रुग्ण देवरूख येथील आहे. दरम्यान दहा रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ३०१ इतकी झाली आहे.