जालना : संभाजी भिडे यांच्या उलट सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होतेय त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय. भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील आठवले यांनी म्हटलंय. वआठवले यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सोमवारी संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये बोलताना माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने अपत्य नसलेल्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती होते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत... त्यावर आठवलेंनी भिंडेंच्या सभांवर बंदी घालण्याची मागणी केली.
तर दुसरीकडे 'आम्ही सदैव भिडे गुरुजींसोबत आहोतच', असं म्हणत शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून भिडेंना पाठिंबा दर्शवलाय. 'भिडे गुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत. म्हणूनच हाती तलवारी वगैरे घेऊन लढण्याची गर्जना त्यांनी केली आहे, असंही या अग्रलेखात म्हटलं गेलंय.
'भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात हे दिसले. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो' असं म्हणत एकप्रकारे सेनेनं भीमा कोरेगाव प्रकरणात भिडेंचा हात असल्याच्या आरोपांना एकप्रकारे दुजोरा दिल्याचंच अनेकांचं म्हणणं आहे.