नागपूर : दिघोरी परिसरातल्या आराधना नगर इथे पवनकर कुटुंबातील पाच जणांना निर्घृण खून करण्यात आला. घरातल्या पाच जणांना रात्रीच्या झोपेतच जीवे मारण्यात आलंय. कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना, आई मीराबाई, मुलगी वेदांती आणि भाचा गणेश पालटकर यांच्या डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करून त्यांना ठार मारण्यात आलंय. या हत्याकांडातून कुटुंबातल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या.
कमलाकर यांची मुलगी वैष्णवी आणि भाची मिताली या दुसऱ्या खोलीत झोपल्या असल्यामुळे हल्लेखोरांच्या तावडीतून सुटल्या. सकाळी या दोघी बाहेर आल्यावर त्यांनी पाहिले ते आपल्या कुटुंबीयांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह...
कुटुंबातल्याच व्यक्तीने हे हत्याकांड घडवल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. नागपुरातील पाच जणांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा फोटो जारी केलाय. आरोपीविषयी माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केलंय. आरोपीविषयी माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलंय.