कोळी बांधव आणि नारळी पौर्णिमेचं नातं काय? कोळी महिला उधाणलेल्या समुद्राला काय साकडं घालतात?

Narali Purnima 2024 Importance in Marathi: नारळी पौर्णिमा आणि समुद्राचे नाते काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचबद्दल आज जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 19, 2024, 10:16 AM IST
कोळी बांधव आणि नारळी पौर्णिमेचं नातं काय?  कोळी महिला उधाणलेल्या समुद्राला काय साकडं घालतात?  title=
Raksha Bandhan 2024 What is Narali Purnima and why it is important for fisherman

Narali Purnima 2024 Importance in Marathi: श्रावण महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्त्व आहे. या दिवशीच रक्षाबंधनदेखील साजरे केले जाते. मात्र, महाराष्ट्रात रक्षाबंधनासोबतच नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. नारळी भात आणि समुद्राची पूजा करुन हा सण साजरा केला जातो. कोळी बांधवांचा मुख्य सण म्हणूनही नारळी पौर्णिमेकडे पाहिले जाते. पण नारळीपौर्णिमा आणि समुद्राचं नात काय? हे तुम्हाला माहितीये का? तर आज जाणून घेऊया. 

महाराष्ट्रात किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कोळी समाज समुद्राला नारळ अर्पण करतात. तसंच, होडीचीदेखील पूजा केली जाते. कोळी समाज असलेल्या वाड्या-वस्तींमध्ये पारंपारिक वस्त्रे परिधान करुन मोठ्या धुमधडाक्यात मिरवणूका काढल्या जातात. काही ठिकाणी समुद्राला सोन्याचा नारळदेखील अर्पण केला जातो 

नारळी पौर्णिमा आणि कोळी समाज

पावसाळ्यात दीड ते दोन महिने मच्छिमारी बंद असते. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी पुन्हा सुरू केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करुन पुन्हा व्यवसाय सुरू केला जातो. म्हणूनच या सणाला कोळी बांधवांमध्ये खूप महत्त्व आहे. खवळलेला समुद्र शांत होऊ दे, असं गाऱ्हाणं या दिवशी घातलं जातं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती असतानाच नारळ अर्पण केला जातो. 

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 

निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळीबांधव हा सण साजरा करतात. भर समुद्रात मासेमारी करायला निघालेल्या आपल्या धन्याच्या सुरक्षिततेसाठी कोळी महिला समुद्रदेवाची पूजा करतात. उधाणलेल्या समुद्रातही जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, अशी मनोभावे पूजा त्या करतात. खोस समुद्रात जाणाऱ्या आमच्या कुंकवाचे रक्षण कर, आमच्या बोटीव मुबलक मासोळी मिळू देत, असं गाऱ्हाणे कोळी महिला समुद्रदेवाला घालतात. 

नारळी पौर्णिमेला कोळी बांधवाच्या बोटीही छान पताका व रंगरंगोटी करुन सजवल्या जातात. नारळाचा सोन्याचे वेष्टन किंवा पत्रा गुंडाळून विधिवत समुद्राला अर्पण केले जाते. नारळ हा सर्जनशक्तीचे प्रतीक मानले जाते. ओल्या नारळाच्या करंजीचा नैवैद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. नंतर ही बोट समुद्रात सोडली जाते. 

रक्षाबंधनाला नारळी भात कसा बनवाल?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जुन नारळी भात केला जातो. नारळी भात कसा करावा याची रेसिपी पाहूया. 

साहित्य

ओलं खोबरं, सुगंधी तांदूळ, काजू, गूळ, केशर, तूप, वेलची, दालचिनी, लवंग, नारळाचे दूध, वेलची आणि जायफळ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @circle_of_happiness_2024

कृती

तूपामध्ये वेलची, दालचिनी, लवंग आणि काजू टाकावेत. यानंतर सुंगधी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकावेत. यानंतर नारळाचं दूध घालून छान हलक्या हाताने ढवळून घ्यावं. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध, केशर घालून परतून घ्यावे आणि पुन्हा झाकण मारुन ठेवावे. भात शिजल्यावर त्यामध्ये ओलं नारळाचं खोबरं घालावे. भात हलक्या हाताने परतून त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ किसून घ्यावे आणि चवीसाठी अगदी चिमुटभर मीठ घालावे.