Pune Rikshaw Offer: आज देशभरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. हिंदु धर्मात या सणाला खूप मोठे स्थान आहे. जिथे बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. तसेच गिफ्टदेखील देतो. आयुष्यभर आपल्याला साथ देणाऱ्या, कधी ओरडणाऱ्या तर कधी समजूत काढणाऱ्या, कधी रागवणाऱ्या तर कधी प्रेमाने जवळ येणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणीला स्पेशल फील करुन देण्याचा हा दिवस आहे. रक्षाबंधन निमित्त बहिणीला काय गिफ्ट द्यायचं असा विचार भाऊ करत असतात. महाराष्ट्र सरकारने नुकतीच बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. रक्षाबंधनपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये येऊ लागले आहेत. दरम्यान पुणेकर भावांनी नेहमीप्रमाणे आपलं वेगळेपण जपलंय. त्यांनी रक्षाबंधन निमित्त बहिणींना आगळ वेगळं गिफ्ट दिलंय.
पुणेकर नेहमी आपल्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. जग करत असलेली गोष्ट आपण किती वेगळेपणाने, अनोख्या पद्धतीने करु शकतो हे पुणेकरांना चांगलंच जमत. अशा विविध गुणांमुळे पुणेकरांची खास ओळख करुन दिली जाते आहे. पुणेकर रिक्षावाल्यांची आज राज्यभरात चर्चा होतेय. यामागचं कारणही तसंच आहे.
रक्षाबंधनसाठी पुण्यात प्रवास करणाऱ्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही आज पुणे रेल्वे स्थानकात उतरताय आणि पुढे प्रवास करत असाल तर येथे लक्ष द्या. कारण तुमचा प्रवास आज मोफत होऊ शकतो. जवळच्या भाड्यासाठी तुमच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. दूरच्या प्रवासात एकूण भाड्यात तुम्हाला 100 रुपयांचे मोठे डिस्काऊंट मिळणार आहे. पुण्यातील रिक्षावाल्यांनी लाडकी बहीण ऑफर सुरु केलीय. या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यात रिक्षा प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. आज रक्षाबंधन असल्याने मुली, महिलांना भावांकडून स्पेशल फील करुन देण्याचा दिवस आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रिक्षा चालकाने मोठा निर्णय घेतलाय. पुण्यात आपल्या भावांना किंवा परिवाराला भेटण्यास जाणाऱ्या महिलांसाठी ही खास ऑफर आणण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलांकडून 100 रुपयांपर्यंत रिक्षा भाडे घेतले जाणार नाही.
पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेच्या रिक्षा मित्र प्रिपेड बुथने रक्षाबंधन निमित्त हा अनोखा उपक्रम राबवलाय. 100 रुपयांच्या वर बील गेल्यास त्यातून 100 रुपये कमी केले जातील. केवळ त्यावरचे पैसे घेतले जातील. रक्षाबंधनसाठी आमच्याकडून महिलांना हे खास गिफ्ट आहे. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बघतोय रिक्षावालाचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी केले आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी महिलांना रिक्षा मित्र प्रिपेड बूथ, पुणे रेल्वे स्टेशन, तिकीट रिझर्व्हेशन सेंटरच्या समोर. या ठिकाणाहून रिक्षा पकडावी लागेल.