औरंगाबाद : सातबारा कोरा होईपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय.
शेतकऱ्यांचा लढा देशपातळीवर नेणार असल्याचंही त्यांनी औरंगाबादमध्ये सांगितलं. देशभरातील १६० विविध संघटना एकत्र आल्याचं त्यांनी म्हटलंय.
३१ ऑगस्टपासून पंजाबमधून कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी लढा देणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केलंय. उत्तर भारतानंतर शेतकऱ्यांचा लढा दक्षिण भारतातही पुकारण्यात येणार असून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देशभरातील शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
हमीभावाबाबत सरकारनं दिलेले आश्वासनं पाळलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सामील नसल्याचं त्यांनी सांगितलंय. सदाभाऊ संदर्भात निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यायचा आहे, अशी टीका त्यांनी केलीय. सध्या पक्ष फोडण्याचे प्रकार सुरु असून सर्वच पक्ष समदु:खी असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी मिष्कीलपणे म्हटलंय.