Raj Thackeray On Bharat Ratna : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन जणांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि हरित क्रांतीचे जनक एस. एम स्वामीनाथन यांच्या नावाचा समावेश आहे. त्याआधी मोदी सरकारने कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवानी यांना काही दिवसांपूर्वीच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे. (Raj Thackeray demand Bharat Ratna to Shivsena chief Balasaheb Thackeray)
काय म्हणाले राज ठाकरे?
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता, असं म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी देखील व्यक्त केली.
बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा… pic.twitter.com/2V4niOX7Au
— Raj Thackeray (@RajThackeray) February 9, 2024
दरम्यान, राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना भारत रत्न देण्याची मागणी केल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं कौतूक केलंय. राज ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालय, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग करत ही मागणी केली आहे.