Raj Thackeray And Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निकालाने सर्व राजकीय विश्लेषक, एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होईल, असे सर्व अंदाज सांगत होते. पण विधानसभा निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. महायुतीला 231 जागा तर महाविकास आघाडीला 45 जागा मिळाल्या आहेत. या सर्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही, हा निकाल मनसैनिकांसाठी खूपच धक्कादायक आहे. विधानसभा निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियात एका शब्दाची प्रतिक्रिया दिली आहे. यावर सोशल मीडियात ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याचा सल्ला दिला जातोय.
विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 'एकला चलो रे'ची भूमिका घेण्यात आली. सुरुवातील सर्व जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहे, तुम्ही तयारीला लागा असे मनसे अध्यक्षांनी सांगितले होते. यानंतर 138 जागांवर मनसेने उमेदवार दिले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदारसंघात जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळत होते. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील, माहिममधून अमित ठाकरे, खडकवासलामधून मयुरेश वांजळे, ठाण्यात अविनाश जाधव, शिवडी मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक उमेदवार विजयी होतील असा विश्वास मनसेला होता. पण यातील एकही उमेदवार निवडून आला नाही. सकाळपासून विधानसभा निवडणुकीचे कौल समोर येत असताना राजू पाटील, अमित ठाकरे वगळता कोणता उमेदवार आघाडीवर असल्याचेही दिसले नाही.
विधानसभेत महायुतीचे सरकार येईल, भाजपचा मुख्यमंत्री असेल. यात मनसेचाही सहभाग असेल असे निवडणुकीआधी पक्षाकडून सांगण्यात येत होते. महायुतीचे सरकार आले पण मनसेचा उमेदवार निवडून न येणे हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय. अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मतदारांचे आभार मानले आणि काम करत राहणार असल्याचा विश्वास दिला. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडणार? याकडे मनसैनिकांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान सोशल मीडियामध्ये एका शब्दाची पोस्ट लिहिली. 'अविश्वसनीय' असे ते या पोस्टमध्ये म्हणाले.
राज ठाकरे यांच्या पोस्टवर काही मिनिटांतच कमेंट्सचा पाऊस पडायला पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही. '18 वर्षांचा संघर्ष आता 23 वर्षांचा होईल,अजून काय होणार आहे ?हरकत नाही पुन्हा उद्यापासून नव्याने सुरुवात करू.हरलो पण अंत नाही आणि जिंकणे हे अमरत्व नाही. निकाल काहीही लागो..साहेब आम्ही कायमच तुमच्या पाठीशी शेवट पर्यंत राहणार, अशा प्रतिक्रिया मनसैनिकांकडून येऊ लागल्या. या सर्वामध्ये बहुतांश प्रतिक्रिया या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र याव्यात असे आवाहन करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. दोघा भावांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रियादेखील व्यक्त करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे'चा नारा दिला. पण निकालानंतर सोशल मीडियात 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' असे आवाहन राज ठाकरे यांना केले जात आहेत. 'दोन्ही ठाकरे बंधूंनी आता एकत्र येऊन लढण्याची गरज आहे . गर्व, अहंकार बाजूला ठेवून पुढे झटून काम केले तर महाराष्ट्र नक्की सोबत येईल. कारण बाकी लोकांसोबत युती करावी च लागेल तर ती सुरुवात घरातूनच करावी' अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
'तुमच्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठीसुद्धा अविश्वसनीय असाच निकाल आहे!आता या वर एकाच उपाय आहे तो म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येणे आणि मराठी मतांची मोठी ताकद निर्माण करणे हाच मार्ग दिसतोय!', अशी प्रतिक्रियादेखील एका हितचिंतकाने दिली आहे. 'दोन्ही भाऊ एकत्र आले तरच आता काय ते चांगलं होईल...' अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली आहे. 'अजूनही वेळ गेली नाही आहे भाऊ भाऊ एकत्र येऊन बाळासाहेबांचा वारसा चालवा', अशी कमेंटही एका युजरने केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली जाते. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना झी 24 तासच्या जाहीर सभेत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते भावूक झाले, त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. 'ठाकरे बंधुंनी खरच एकत्र यायला हवे. तर महाराष्ट्राच नंदनवन होईल.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आदित्य ठाकरेंना हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं. अमित ठाकरेंनादेखील हा प्रश्न विचारण्यात आल्यावर अशी शक्यता त्यांनी फेटाळली.