ठाणे : मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतीवर बसला असून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाचे कर्मचारी मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे लवकरात लवकर भातशेतीचे पंचनामेकरून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी आता थेट आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातकापणीचे दिवस तोंडावर असताना गेली चार ते पाच दिवस पडलेल्या परतीच्या पावसाचा जोरदार फटका भातशेतीवर बसला आहे.
पावसामुळे बहुतेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने भाते पिके कुजली. तर काही ठिकाणी कापून ठेवलेली भातपिकं खराब झाली आहेत. तर कापलेल्या भातपिकांच्या लोंब्याना मोड आल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आपण नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली असून लवकर शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.