पुणे : पुण्यात चक्क रेल्वेचं इंजिन रस्त्यावर आलं. खडकीत जुन्या पुणे - मुंबई मार्गावर रेल्वे इंजिन अवतरल्यानं वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली. बुधवारची ही घटना आहे. खडकीमध्ये सैन्यदलाचा दारुगोळा कारखाना आणि डेपो आहे. इथल्या सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी खडकी स्टेशन ते डेपोपर्यंत रुळ टाकण्यात आलेले आहेत. हे रुळ रस्त्यावरून आडवे गेलेत.
त्यांचा वापर क्वचितच होतो. आणि जेव्हा या रुळांवरून इंजिन जाणार असतं, तेव्हा परिसरातल्या नागरिकांना आगावु सूचना देण्यात येते. यावेळी मात्र नागरिकांना या कशाचीच कल्पना नव्हती. रेल्वेचे कर्मचारी या इंजिनसोबत होते. त्यांनी हे इंजिन हलवले. रस्त्यावर इंजिन आलेलं पाहून लोक थोडे भांबावले. अडथळ्यांची शर्यत पार करत वाहन चालवण्याची सवय पुणेकरांना असल्यानं त्यांनी इंजिनाला नागमोडी वळसा घालत आपली वाहनं दामटली.