Nitin Desai Death : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याची चर्चा आता सुरू झाली.
नितीन चंद्रकांत देसाई या नावातच कलेचं भव्य दिव्य स्वप्न आणि रिकाम्या जागेला दिमाखदार करण्याची जादू होती. कलाकार म्हणून घडवलेली सर्वोच्च वास्तू एन डी स्टुडिओमध्येच त्यांनी जगण्याचा शेवट केला. पहाटे चारच्या सुमाराला स्टुडिओमध्ये गळफास लावून नितीन देसाईंनी आत्महत्या केली.
भारतातला अव्वल कलादिग्दर्शक अशी नितीन चंद्रकांत देसाई यांची ओळख होती. 1942 लव्ह स्टोरी सिनेमापासून नितीन देसाईंची घोडदौड सुरू झाली...लगान, देवदास, जोधा अकबर अशा एक से बढकर एक चित्रपटांमधल्या भव्य दिव्य सेटचे बॉलिवूडमध्ये नवे बेंचमार्क सेट केले. काही हॉलिवूड सिनेमांसाठीही त्यांनी योगदान दिलं. प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथांचं कलादिग्दर्शनही चंद्रकांत देसाईच करायचे. त्याचबरोबर लालबागच्या राजाचा सेटही नितीन चंद्रकांत देसाईच उभारायचे.
नितीन देसाईंनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, यावर आता चर्चा सुरू झालीय. यासंदर्भात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन देसाई दिल्लीहून रात्री अडीचला एनडी स्टुडिओत पोहोचले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी काही व्हॉईस क्लिप रेकॉर्ड केल्याची चर्चा आहे. या व्हॉईस क्लिपमध्ये काही उद्योगपतींची नावं असल्याचा दावा करण्यात येत आहे. आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. त्यांनी उभारलेल्या एन डी स्टुडिओवरचं अडीचशे कोटींचं कर्ज न फेडल्यानं जप्तीची कारवाई होणार होती, अशीही चर्चा आहे. बॉलिवूडमधला एक गट एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग होऊ देत नव्हता, असा आरोप देसाईंच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
नितीन देसाई म्हणायचे अख्खं आकाश हा माझ्यासाठी कॅनव्हास आहे. आभाळाएवढ्या मोठ्या कॅनव्हासमधून जगण्यातली उत्तरंही नक्कीच सापडली असती. मात्र, स्वतःच उभारलेल्या भव्य दिव्य सेटमध्ये या अवलिया कलाकारानं घेतलेली धक्कादायक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली.
नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी दिलीय. त्यांच्याजवळ सापडलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा तपास केला जाईल असही त्यांनी सांगितलंय. नितीन देसाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून 5 डॉक्टरांमार्फत शवविच्छेदन केलं जाणारंय. त्यांच्या मृतदेहावर ND स्टुडिओतच अत्यंसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येची कसून चौकशी केली जाईल अशी माहिती रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी दिलीय. त्यांच्याजवळ सापडलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा तपास केला जाईल असही त्यांनी सांगितलंय. नितीन देसाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून 5 डॉक्टरांमार्फत शवविच्छेदन केलं जाणारंय. त्यांच्या मृतदेहावर ND स्टुडिओतच अत्यंसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.