मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने 13 वाहने एकमेकांवर आदळली

Mumbai Pune Expressway : या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Updated: Apr 27, 2023, 02:40 PM IST
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने 13 वाहने एकमेकांवर आदळली title=

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) अनेक वाहनांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. खोपोली (Khopoli) एक्झिट जवळ वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या भीषण अपघातात 13 वाहने एकमेकांवर आदळली आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना खोपोली येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील खोपीलीजवळील एक्झिट जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबीची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये दोन ट्रक आणि 11 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता गाड्या बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

दुसरीकडे, गोंदियामध्ये अज्ञात वाहनाने कारला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर तीन जखमी झाले आहेत. अज्ञात वाहनाने ऑल्टो कारला दिलेल्या धडकेत कारमधील एक जण ठार झाल्याची घटना तिरोडा तालुक्यातील पांजरा गावाजवळ रात्री घडली. वडेगाव येथील दोमाजी ठाकरे हे आपल्या ऑल्टो कारने वडेगाव येथून मेहगाव, तुमसर येथे लग्न समारंभाकरता कुटुंबातील तीन सदस्यांसह गेले होते. स्वागत समारोह आटोपून गावाकडे येत असताना पांजरा गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत डोमाजी ठाकरे (85) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नातू इंदल ठाकरे याचा उजवा पाय तुटला आहे. तसेच दोन्ही सुनांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.