Shocking News : साता जन्माच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातात. प्रत्यक्षात लग्न करताना शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देण्याचा आणाभाका घेतल्या जातात. काही नाती टिकतात तर काही टिकत नाहीत. पण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या जोडीदाराला साथ देणारे क्वचितच दिसतात. मात्र रायगडच्या रोहा तालुक्यात याचा प्रत्यय आला आहे. एका वृद्ध दाम्पत्याने शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ दिली आणि एकाच वेळी देह त्यागला आहे. रोहा तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
रोहा तालुक्यातील पाथरशेत गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाथरशेत गावातील वयोवृद्ध दाम्पत्याने एकाच वेळी जगाचा निरोप घेतला आहे. वयोवृद्ध पतीला अखेरचा श्वास घेताना पाहून अर्धांगिनीनेही डोळे मिटले. पतीच्या निधनानंतर पत्नी जमिनीवर कोसळली आणि एकाचवेळी दोघांचे निधन झाले. या सर्व घटनेनंतर पाथरशेत गावावर शोककळा पसरली आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते गंगाराम महादू घाडगे (83) आणि निर्मला गंगाराम घाडगे (80) या वृद्ध दाम्पत्याचे निधन झाले आहे. गंगाराम घाडगे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गंगाराम घाडगे यांचे पुतणे राजेश घाडगे हे गावी गेले होते. त्यावेळी राजेश घाडगे यांनी गंगाराम घाडगे यांची विचारपूस केली. राजेश घाडगे यांच्यासोबत बोलत असतानाच गंगाराम घाडगे यांना उचकी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रसंग निर्मला घाडगे यांनी पाहिली. पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने त्याही जागीच कोसळल्या. एकाच वेळी दोघांनाही प्राण सोडल्याने घाडगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यानंतर या दाम्पत्याची गावातून एकत्र अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाराम घाडगे यांच्यामागे तीन मुले,सुना,नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. गंगाराम घाडगे हे गावात 'बंधवा' या नावाने गावात ओळखले जायचे. गावात सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागणारे अशीच त्यांची ओळख होती.
दाम्पत्याने निभावली 65 वर्षे एकमेकांची साथ
दरम्यान काही महिन्यांपूर्वी सोलापुरातही असाच काहीसा प्रकार झाल्याचे समोर आले होते. 90 वर्षांच्या पतीने अखेरचा श्वास घेतल्यानंतर काही मिनिटांतमध्ये त्यांच्या 80 वर्षीय पत्नीनेही जगाचा निरोप घेतला होता. तब्बल 65 वर्षे एकत्र संसार केल्यानंतर या दाम्पत्याने एकाच वेळी प्राण सोडले होते. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी हे दोघेही लग्नबंधनात अडकले होते. बरीच वर्षे एकत्र घालवल्यानंतर पतीचे निधन झाल्याचे दुःख पत्नीला सहन झाले नाही. याच विरहात पत्नीनेही प्राण सोडला.