Kasba By Election : कसबा पेठ (Kasbapeth) तब्बल 28 वर्षं भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपच्या हेमंत रासनेंना (Hemant Rasane) तब्बल 10 हजार 915 मतांनी पराभूत करून भाजपचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. कसब्याच्या पेठांमधील मतदार म्हणजे भाजपचे कट्टर समर्थक असं मानलं जायचं. मात्र मतदारांना अशाप्रकारे गृहित धरणं भाजपला भोवल्याची चर्चा आता सुरू झालीय. मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजपचं कमळ का कोमेजलं, हे स्पष्ट होतं. कसब्यातील प्रभाग क्र. 15 म्हणजे शनिवार पेठ (Shanivar Peth) आणि सदाशिव पेठ (Sadashiv Peth) हा हेमंत रासनेंचा मतदारसंघ. केवळ तिथंच त्यांना आघाडी मिळवता आली, बाकी पाचही प्रभागांमध्ये धंगेकरांनी भाजपला अस्मान दाखवलं.
पेठांमधील मतदारांना गृहित धरणं भोवलं?
शनिवार पेठ-सदाशिव पेठेत धंगेकरांना 14,557 तर रासनेंना 21,763 मतं मिळाली.
कसबा पेठ-सोमवार पेठेत धंगेकरांना 10,594 तर रासनेंना 6 हजार 33 मतं मिळाली.
रास्ता पेठ-रविवार पेठेत धंगेकरांनी 16 हजार 714 मतं मिळवली, तर रासनेंना 10 हजार 639 मतं
खडकमाळ-महात्मा फुले पेठेत धंगेकरांना 15 हजार 360 तर रासनेंना 10 हजार 880 मतं मिळाली
लोहिया नगर-कासेवाडीत धंगेकरांची मतं होती 5 हजार 793 तर रासनेंची मतं होती 4 हजार 431
नवी पेठ आणि पर्वतीमध्ये धंगेकरांनी 10 हजार 176 मते, तर रासनेंनी 8 हजार 498 मतं मिळवली...
विशेष म्हणजे या प्रभागांमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. त्यापैकी धीरज घाटे यांना सभागृह नेतेपद, तर सरस्वती शेंडगेंना उपमहापौरपद देण्यात आलं होतं. घाटे हे स्वतः कसब्यातून निवडणूक लढवायला इच्छुक होते. त्यांची आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठांनी केला. मात्र तरीही धंगेकरांना या प्रभागांमध्ये मताधिक्य मिळालेच. ब्राह्मण उमेदवार (Brahmin Candidate) न दिल्याचा फटकाही भाजपला बसल्याचं बोललं जातंय.
ब्राह्मण उमेदवाराला डावलल्याचा फटका?
2019 ला कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णींची उमेदवारी कापून चंद्रकांत पाटलांना दिली. तर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातच तिकीट दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र भाजपनं हेमंत रासनेंना उमेदवारी दिल्यानं ब्राह्मण समाजाची (Brahmin Society) नाराजी वाढली. ब्राह्मण समाज नोटाला मतदान करेल, अशी देखील अटकळ होती. प्रत्यक्षात धंगेकरांना मतदान करून ब्राह्मण समाजानं आपली नाराजी व्यक्त केल्याचं आता स्पष्ट दिसतंय.
कसब्यातील पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचं सूतोवाच भाजप नेत्यांनी केलंय..पोटनिवडणुकीत ठेच लागल्यानंतर आता भाजप झालेल्या चुका सुधारेल, अशी अपेक्षा आहे. नाहीतर 2024 च्या निवडणुकीतही कसबा धंगेकरांचाच हे समीकरण पक्कं झाल्याशिवाय राहणार नाही.