तरुणीला लिफ्ट देणं पुणेकराला पडलं महागात, 14 हजारांना लुटलं

पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल 

Updated: Nov 1, 2018, 10:13 PM IST
तरुणीला लिफ्ट देणं पुणेकराला पडलं महागात, 14 हजारांना लुटलं title=

पुणे : एखाद्या तरुणीला लिफ्ट देणं किती महागात पडू शकतं याचा अनुभव पुण्यातील एका व्यक्तीनं घेतला. या तरुणीनं तिला लिफ्ट देणाऱ्या दुचाकी चालकाविरोधात विनयभंग केल्याचा कांगावा करत त्याच्याकडील १४ हजार रुपये लुटून नेले. पुण्यातील साधू वासवानी रस्त्यावर लाल टॉप आणि निळी जीन्स परिधान केलेली एक देखणी तरुणी उभी होती. साधारणपणे पंचविशीतील ही तरुणी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रिक्षा स्टॅन्ड पर्यंत जाण्यासाठी लिफ्ट मागताना दिसली.

तरुणीविरुद्ध गुन्हा

तेवढ्यात स्वतःच्या स्कुटीवरून घराकडे निघालेले एक गृहस्थ चौकात थांबले आणि त्या तरुणीला त्यांनी लिफ्ट दिली. थोड अंतर पुढे गेल्यावर साधारणपणे ५३ वर्षे वय असलेले हे गृहस्थ आणि तरुणीत राडा झाला. या घटनेप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

नेमकं काय झालं ? 

ती तरुणी दुचाकीचालकावर विनयभंगाचा आरोप करु लागली. हे प्रकरण इथेच मिटवायचं असेल तर असतील तेवढे पैसे देण्याची मागणी तिने त्या गृहस्थाकडे केली. 

घाबरलेल्या अवस्थेतील दुचाकीचालकाने घराच्या हप्त्यासाठीचे म्ह्णून ठेवलेले १४ हजार रुपये तरुणीला दिले. ते सगळे पैसे घेऊन ती तरुणी अंधाऱ्या रस्त्यानं पसार झाली.

सावधानी बाळगा 

तक्रारदार गृहस्थ सरकारी नोकर असून पुण्यातील नारायणपेठेत राहतात. मासे खाण्यासाठी म्ह्णून घराबाहेर पडले असताना हा प्रकार घडल्याचं त्यांच्या जबाबात नमूद करण्यात आलंय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच त्या तरुणीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

रात्री-अपरात्री कुणाला लिफ्ट देणं कसं अंगाशी येऊ शकतं ? याचा अनुभव यानिमित्तानं मिळालायं.  अशा स्वरूपाची मदत करताना योग्य ती सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.