संततधार पावसामुळे दोन दिवसांपासून पाभे गावाचा संपर्क तुटला

भिमाशंकर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाची जोरदार बँटिंग सुरु आहे.

Updated: Jul 29, 2019, 08:12 PM IST
संततधार पावसामुळे दोन दिवसांपासून पाभे गावाचा संपर्क तुटला title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : पुणे जिल्ह्याच्या भिमाशंकर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाची जोरदार बँटिंग सुरु आहे. त्यामुळे भिमानदीचे रौद्र्रुप पहायला मिळत असताना भिमाशंकर जवळील पाभे गावात दोन दिवसांपासुन पुराचे पाणी शिरले आहे. तर गावच्या बाजुलाच असणाऱ्या डोंगराचे जोराच्या पावसात भूसख्खलन होण्याची भीती असल्याने संपूर्ण गाव भितीच्या छायेखाली आहे. मात्र गावाला अद्यापही प्रशासनाकडून कुठलीच मदत मिळत नसून गेल्या दोन दिवसांपासून या गावाशी संपर्कही तुटला आहे.      

पाभे गावालगत भिमानदी वरील बंधाऱ्याचा पाण्याचा फुगवटा वाढल्याने पाभे गावात दोन दिवसांपासुन पाणी शिरले आहे. या गावात राहणारी १०० कुटुंबे आणि पाळीव जनावरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाभे गावातील नागरिक मदतीसाठी आवाहन करत आहेत. 

पाभे गावाला जाण्यासाठी येथे गावानजीक भीमानदीवर पूल-बंधारा बांधण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे या बंधाऱ्यात पाणी साठवण्यात येते.  मात्र पावसाळ्यापूर्वी पुलाची सर्व गेटचे ढापे कडून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो. यावर्षी मात्र प्रशासनाने केवळ वरचे ढापे काढले खाली दोन थर काढले नसल्याने पुलात अगोदरच सुमारे पाच फुट पाणीसाठा राहिला होता. आठ दिवसांपासून भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसाची बँटिंग सुरु असल्याने भीमेला पूर आल्याने पुलाच्या पाण्याचा फुगवटा गावापर्यंत आला आहे. गावात पाणी शिरले आहे. 

पाभे गावात पाणी शिरल्याने नागरिक अडचणीत असताना दुसरं संकट डोक्यावर आहे गावाच्या मागे मोठा डोंगर असल्याने जोराच्या पावसात भूसक्क्लन होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.