पुणे : पुण्यात देवाची ऊरळी या भागात गुरुवारी पहाटेच एका दुकानाला आग लागून दुर्घटना घडलीय. या आगीच्या धुराने श्वास कोंडल्यानं आणि भाजल्यानं पाच जणांचा मृत्यू झालाय. एका साडीच्या दुकानाला ही आग लागली होती. मृत पाचही जण या दुकानातील कर्मचारी होते.
पहाटेच्या सुमारास ही आग लागली आणि पाहता पाहताच या आगीनं भीषण रुप धारण केलं. राजयोग साडी सेंटर या दुकानाला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तर खाजगी पाण्याचे दहा टँकर दाखल घटनास्थळी दाखल झाले.
जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.
घटना घडली त्यावेळी या दुकानात पाच कामगार होते. पाचही जणांचे मृतदेह सुरक्षा दलाच्या हाती लागलेत. हे सर्व कर्मचारी दिवसभर दुकानात काम करून रात्री तिथंच विश्राम करत होते. सर्व मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आलंय.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय.