Pune Bomb Threat: ...म्हणून त्याने केला पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याचा कॉल; मनमाडमधून एकाला अटक

सकाळी पुणे स्थानकातील नियंत्रण कक्षात आलेल्या फोनमुळे एकच खळबळ उडाली आणि या परिसरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला, डॉग स्कॉडच्या मदतीने स्थानकाची तपासणी करण्यात आली

Updated: Jan 14, 2023, 11:49 AM IST
Pune Bomb Threat: ...म्हणून त्याने केला पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याचा कॉल; मनमाडमधून एकाला अटक title=
pune Railway station bomb threat arrest

Pune Bomb Threat: पुण्यामध्ये 16 आणि 17 तारखेला होत असलेल्या जी-20 बैठकीच्या दोन दिवस आधीच पुणे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी मनमाडमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पुणे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यामागील संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा या अटकेमुळे झाला आहे. राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर गोंधळ उडवून देणारा हा सारा प्रकार रेल्वेच्या बोगीत झालेल्या एका भांडणामुळे घडल्याचं अजब कारण समोर आलं आहे. रागात केलेल्या फोन कॉलमुळे हा सारा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालं आहे.

मनमाडमधून अटक

आज सकाळी पुणे रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडली. एका निनावी फोनवरुन ही धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली. डॉग स्कॉडच्या मदतीने संपूर्ण रेल्वे स्थानकाची तपासणी केल्यानंतर स्थानकामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र हा फोन मनमाडमधून आल्याने पोलिसांनी फोन करणाऱ्याला अटक करण्यासाठी मनमाडच्या दिशेने धाव घेतली.

पुणे स्थानकावर नेमकं घडलं काय

काही तासांमध्येच पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये मनमाडमधून एका तरुणाला अटक केली. या तरुणाचं नाव गोविंद मांडे असं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणासंदर्भातील सविस्तर माहिती देताना बोगीमध्ये झालेल्या भांडणामधून पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात 112 क्रमांकावर फोन करुन पुणे रेल्वे स्थानकामध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली. या फोनमुळे पुणे रेल्वे स्थानकामधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आणि तपासणी सुरु करण्यात आली. मात्र नंतर ही माहिती खोटी असल्याचं उघड झालं. 

ही धमकी कशामुळे देण्यात आली, नक्की काय घडलं मनमाड स्थानकावर

फोनसंदर्भातील तांत्रिक माहितीच्या आधारे कात्रज परिसरातून पोलीस निरिक्षक भिडे आणि एलसीबी पोलिसांनी फोन करणाऱ्या गोविंद मांडेला अटक केली. ही व्यक्ती काल रात्री मनमाड ते पुणे असा प्रवास करत असताना झालेल्या एका वादामधून ही खोटी माहिती देण्यात आल्याचा प्रकार घडल्याचं तपासात समोर आलं. बोगीमध्ये पोलिसांप्रमाणे दिसणाऱ्या दोन व्यक्तींबरोबर गोविंदचं भांडण झालं. याच रागातून गोविंदने 112 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. हा कॉल त्याने मनमाड स्थानकातून केला होता. कॉल चालू असतानाच या दोन इसमांनी गोविंदच्या हातून फोन खेचून घेत, "आम्हाला दहशतवादी हल्ल्यांचे काम करायचे असते आता आम्ही 142 किलोमीटर ते 150 किलोमीटर या ठिकाणी काम करणार आहोत," असं म्हटलं. हे सारं संभाषण नियंत्रण कक्षामध्ये रेकॉर्ड झालं आणि पोलिस सक्रीय झाले. त्यांनी तातडीने मनमाडला जाऊन गोविंदला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सारा प्रकार समोर आला.

हा प्रकार गैरसमजुतीतून घडला

हा कॉल गैरसमजुतीत झाला असावा असे प्राथमिक तपासात समोर आलं असलं तरी पोलिसांनी सध्या गोविंदला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करणार आहेत. दरम्यान हा सारा प्रकार गौरसमजुतीमधून घडल्याचं समजल्याने पुणे पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे.