'आम्हाला पोर्शे कार परत हवी,' अग्रवाल कुटुंबाने केला अर्ज, बाल न्याय मंडळ म्हणालं...

Pune Porsche Car Acident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 19, 2024, 06:09 PM IST
'आम्हाला पोर्शे कार परत हवी,' अग्रवाल कुटुंबाने केला अर्ज, बाल न्याय मंडळ म्हणालं... title=

Pune Porsche Car Acident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबाने बाल न्याय मंडळात अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथे 19 मे रोजी कारने दुचाकीला उडवलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. कोर्टाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अट घातल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांकडून अर्ज करण्यात आला आहे. बाल न्याय मंडळात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्जावर 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. 28 ऑगस्टला याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. कोर्टाने पोलिसांना यावर 28 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडा असा आदेश दिला होता. पण अद्याप पोलिसांनी यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. 

जामीन अर्जावर उद्या निकाल

या अपघाताप्रकरणी आरोपी मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे, आपातकालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हाळनोकर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण येरवडा कारागृहात असून जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. 20 ऑगस्टला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. 

नेमकी घटना काय?

19 मे रोजी. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श या कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी त्याला रस्त्यावर बेदम मारहाण केली होती. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या अपघातावेळी हा अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. परंतु फक्त 15 तासात त्याला जमीन मंजूर करण्यात आला. जामिनसाठी घातलेल्या अटींमध्ये 300 शब्दांचा निबंधही होती. यावरुन अनेकांनी नाराजी जाहीर केली होती. 

मृतकाच्या मित्राने एफआयआर दाखल करण्यासाठी धाव घेतल्यानं ही घटना पहिल्यांदा समोर आली होती. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा अशी दोघा मृत्यू झालेल्या पीडितांची नावं आहेत. दोघेही मध्यप्रदेशमधील रहिवासी होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले अनिश आणि अश्विनी पुण्यात जॉब करत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पवयीन मुलाला मिळालेल्या जामीनावर आश्चर्य व्यक्त केले होते. 

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीने त्यांना सांगितले की तो दारू पितो हे त्याच्या वडिलांना माहिती आहे. पोलिसांकडे आरोपीचे आणखीन काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामध्ये तो शनिवारी उशिरापर्यंत मित्रांसह मद्यप्राशन करत असल्याचे दिसत आहे.  21 मे रोजी पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला दारू पिऊन पोर्श कार चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली.