Pune Porsche Accident Prakash Ambedkar Ask 6 Questions: पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाला 5 जूनपर्यंत बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश बाल न्याय मंडळाने बुधवारच्या सुनावणीनंतर दिले. मात्र या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारणही ढवळून निघालं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. तसेच या प्रकरणामध्ये सदर मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासंदर्भातील याचिका पोलिसांनी दाखल केली असून हीच सरकारची भूमिका असेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच फडणवीस यांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई केल्याचं सांगताना पोलिसांची पाठराखण केली. पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून कोणीही कोणत्याही प्रकारे या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, विशेष वागणूक दिली असेल तर त्यांच्याविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत, असंही फडणवीस म्हणाले. असं असलं तरी आता बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांवर काही गंभीर आरोप करताना 6 प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पोलिसांकडून अपघातानंतर मरण पावलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाचं नातं काय आहे याबद्दल अधिक प्रश्न विचारत होते, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. "येरवडा पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टाचं नातं काय आहे यासंदर्भातील प्रश्न विचारण्यातच अधिक वेळ घालवला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या दोघांना मद्यधुंदावस्थेत कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने उडवलं. दुसरीकडे या आरोपी मुलाला कथित स्वरुपात पिझ्झा आणि बर्गर देण्यात आलं," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
तसेच पुढे प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणासंदर्भात 6 प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न कोणते आहेत ते पाहूयात..
आपली यंत्रणा श्रीमंत लोकांना कशाप्रकारे झुकतं माप देते हे पाहा
1) अल्पवयीन मुलाला क्लबमध्ये मद्य कसं काय देण्यात आलं?
2) शोरुममध्ये नोंदणीकृत क्रमांकाशिवाय ही कार कशी काय दिली?
3) ही कार वाहतूक पोलिसांच्या नजरेतून कशी काय सुटली?
नक्की वाचा >> Pune Porsche Accident: 'बालन्याय मंडळाचा धिक्कार असो!' अमृता फडणवीसांचा संताप; म्हणाल्या, 'आरोपीला..'
4) या मुलाला आधी जामीन कसा मंजूर झाला? त्याला अल्पवयीन म्हणून कोठडी का सुनावण्यात आली नाही?
5) आठ तासांनंतर अल्कोहोल चाचणी का करण्यात आली?
6) उपमुख्यमंत्री या प्रकरणात मरण पावलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आले पुण्यात आले की बिल्डरच्या मुलाला सोडवण्यासाठी आले?
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, "सर्वच स्तरातून आक्षेप घेण्यात आल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या. यंत्रणांना सध्या जे सुरु आहे ते योग्य वाटत असल्याने घडत नसून सर्वच स्तरातून आक्षेप नोंदवण्यात आल्याने घडतंय. सध्या यंत्रणा कामाला लागून या प्रकरणामध्ये जी काही कामगिरी केली जात आहे त्यासाठी केवळ पुण्यातील नागरिकांचे आभार मानले पाहिजे," असंही म्हटलं आहे.
नक्की वाचा >> पुण्यातील अपघाताची देशभर चर्चा; पण 'पोर्शे'चा नेमका अर्थ काय?
नक्की वाचा >> Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे आमदारपुत्राने सोडलेली शाळा! आमदाराची पत्नी म्हणाली, 'माझ्या मुलासोबत..'
पोस्टच्या शेवटी प्रकाश आंबेडकरांनी, "अंजू आणि मी पालक आहोत. आपल्या पाल्याला गमावण्यासारखं दु:ख नाही. या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलांच्या पालकांसाठी आमचं हृदय तिळ तिळ तुटत आहे," असंही म्हटलं आहे..