Kolhapur News : हाकेला धावणारा नेता हरपला; आमदार पी.एन. पाटील यांचं निधन

Kolhapur News : कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.   

Updated: May 23, 2024, 08:35 AM IST
Kolhapur News : हाकेला धावणारा नेता हरपला; आमदार पी.एन. पाटील यांचं निधन  title=
Kolhapur News mla p n patil dies at the age of 71 political career and photos

मिथुन राजाध्यक्ष, झी मीडिया, कोल्हापूर : (Kolhapur News) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 2024) धर्तीवर राजकीय चर्चा आणि घडामोडींना वेग आलेला असतानाच एका घटनेनं मात्र अनेकांच्याच मनात कालवाकालव केली. कोल्हापुरातून समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील (Kolhapur News mla p n patil) यांचं निधन झालंय वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गेल्या चार दिवसांपासून पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. ज्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झाले. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि 23 मे 2024 रोजी पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पाटील यांच्या डोक्यारा मार लागल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळं त्यांची प्रकृती खालावत गेली.  दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांचं पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सडोली खालसा या त्यांच्या मूळ गावी गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

गांधी कुटुंबाचा विश्वासू, काँग्रेसचा एकनिष्ठ नेता 

जिथं सध्याच्या राजकारणात पक्षासाठी असलेली निष्ठा बाजूला ठेवून स्वार्थ साधण्याच्याच हेतूनं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे तिथं काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी एन पाटील यांची राज्यात ओळख. मागील 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असणाऱ्या पाटील यांनी कोल्हापूरच्या राजकारणासह समाजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. 2004 आणि 2019 असं दोनदा आमदारपदही त्यांनी भूषवलं. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात आणि सर्वसामान्यांमध्ये असणारी प्रतिमा. 

पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 रोजी झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा हे त्यांचं मूळ गाव. 2004 मध्ये पाटील पहिल्यांदा सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी 2009, 2014 मध्ये करवीरमधून निवडणूक लढवली पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालिन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून मागच्या च्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. पी.एन. पाटील हे गेली 4 दशकं जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते. 1999 पासून ते 2019 असे तब्बल 22 वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य काँग्रेसचं उपाध्यक्षपद होतं. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा 

1999 पासून सलग पाच वर्षे ते बँकेचे अध्यक्ष राहिले. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात देखील त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत 25 वर्ष आपला दबदबा कायम ठेवला होता. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या भोगावती साखर कारखान्याचेही ते सध्या अध्यक्ष असून त्यांच्या प्रयत्नातूनच कारखाना सुस्थितीत येताना दिसला. 

पक्षाशी बंडखोरीचा विचारही नाही

पी. एन. पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेक चढ-उतार पाहिले पण, त्यांनी कधीच वेगळ्या पक्षात जाण्याचा विचार केला नाही. गांधी कुटुंबाशी त्यांची कमालीची एकनिष्ठा होती. यामुळे त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहाणे पसंत केलं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांचेही घनिष्ट संबंध. विधानसभा निवडणुकीतील पी एन पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ हे विलासराव देशमुखच करायचे.