पुणे : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी पीएमसी धडकली, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Sheikh Salahuddin Dargah Case : पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यावरुन वाद सुरु झाला आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मात्र मुस्लिम समाजाने याला विरोध केला आहे.  

अरूण म्हेत्रे | Updated: Mar 9, 2024, 01:06 PM IST
पुणे : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी पीएमसी धडकली, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिका आज कारवाई करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्रीच्या सुमारास मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. त्यामुळे आज सकाळपासून पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे.

महापालिकेने दर्ग्याला काही बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर या बांधकामाला महापालिकेने स्टॉप वर्कचे आदेश दिले होते. असं असताना त्याठिकाणी काही बांधकाम करण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुक्रवारी वाढत्या विरोधामुळे ही कारवाई थांबवण्यात आली होती.

शुक्रवारी पुण्यातील कसबा पेठेतल्या  शेख सल्लाह दर्ग्याभोवतीच अतिक्रमण हटवण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात येणार होती. त्यासाठी सुमारे दीड हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मुस्लिम समाजाकडून या कारवाईला विरोध दर्शवण्यात आला. अतिक्रमण कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय दर्गा परिसरात गोळा झाला होता. अखेर ही कारवाई थांबवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तरीदेखील लोक पहाटेपर्यंत तिथेच थांबून होते. यासंदर्भात शनिवारी सकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार होता. 

दर्ग्याच्या ठिकाणी करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम काढून घेण्यात यावं अशी नोटीस महापालिकेने 15 दिवसांपूर्वी बजावलेली आहे. या नोटिसीमध्ये आठ दिवसांमध्ये हे बांधकाम काढण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र दर्गा कमिटी कडून तिचं पालन झालं नाही. नोटीस बजावूनही हे बांधकाम काढण्यात आलेलं नाही. त्यामुळे महापालिका पोलीस बंदोबस्तात हे अनधिकृत बांधकाम काढण्याची शक्यता आहे.

दरम्यान या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर हा दर्गा उभारण्यात आल्याचं हिंदुत्ववादी संघटनांच म्हणणं आहे. त्याबाबतचा वाद न्यायालयात सुरू आहे. दुसरीकडे, जे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेला आहे त्यावरच कारवाई केली जाणार आहे. संपूर्ण दर्ग्यावर कारवाई केली जाणार नाही असं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x