हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक'

Pune Hinjewadi Latest News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?

सौरभ तळेकर | Updated: May 30, 2024, 03:27 PM IST
हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक' title=
Pune News Hinjewadi Trafic jam

Pune Hinjewadi Latest News : एकेकाळी प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध असलेलं पुणे शहर सध्या ट्रॅफिकच्या जाळ्यात अडकलंय. हिंजवडी आयटी पार्कमधलं (Hinjewadi IT Park) गाड्यांचे जाळं दिवसेंदिवस वाढतच चाललंय. इन्फोसीस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या बड्या कंपन्या तसंच शेकडो आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी जवळपास रोजच या ट्रॅफिक जॅमच्या चक्रव्युहात अडकतात. वाहतूक कोंडीत (Trafic jam) प्रत्येकाचेच जवळपास दीड ते अडीच तास वाया जातात. पावसाळ्यात तर समस्या आणखीच गंभीर होते. याच ट्रॅफिक जॅमच्या जाचाला कंटाळून जवळपास 37 कंपन्या स्थलांतरीत झाल्यात. आणखी अनेक कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशननं दिली.

हिंजवडीत ट्रॅफिक समस्या वाढण्याचं कारण काय?

हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे 150 कंपन्या आहेत. तिथं सुमारे 5 लाख लोक काम करतात. हिंजवडीत दिवसाला 1 लाख कार धावतात. प्रत्येक कार रस्त्यात दीड ते दोन तास रखडतं. त्यामुळं लाखो रुपयांचं इंधन वाया जातं. शिवाय कंपन्यांचं तासाला 25 डॉलरचं नुकसान होतं. 

उद्योगमंत्री म्हणतात...

आता आयटी कंपन्यांच्या स्थलांतरामुळं बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जातेय. हिंजवडी ग्रामपंचायतीनं देखील याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी केलीय. याबाबत उद्योगमंत्र्यांचं लक्ष झी 24 तासनं वेधलं, तेव्हा माहिती घेतो, असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय.

सध्या हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक आणि भूमकर चौक हेच पर्याय आहेत. पण लवकरच माण हिंजवडी पासून शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळं ट्रॅफिक समस्या कमी होईल, असा अंदाज आहे. स्थानिक प्रशासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. कारण आयटी कंपन्यांचं स्थलांतर महाराष्ट्राला परवडणारं नाही. 

दरम्यान, हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो स्टेशन (Metro station) स्काय बसने (SkyBus) जोडले जाणार आहेत. तसेच भूमीगत मेट्रो आणि रिंग रोडच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती. मात्र, याचं काम सुरू कधी होणार आणि पुणेकरांची सुटका कधी होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे.