सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : (Pune News) पती- पत्नीच्या नात्यात दुरावा आल्यानंतर काही जोड्या अगदीच टोकाचा निर्णय घेत घटस्फोटाची वाट निवडतात. नात्याच्या या टप्प्यावर आरोप प्रत्यारोप होतात, उणीधुणी काढली जातात आणि अनेकदा काही अशा अटी समोर ठेवल्या जातात की पाहणारेही चक्रावतात. सध्या पुण्यात असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं एका घटस्फोटाचीच प्रचंड चर्चा सुरु आहे.
पुण्यातील एका पतीने पत्नीकडून घटस्फोट मिळवून घेण्यासाठी एक अजब मागणी केली आहे. त्यानं पत्नीला भेट म्हणून दिलेला पोपट परत देण्याची मागणी केल्यामुळं आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. घटस्फोटासाठी अर्ज केलेलं पुण्यातील हे जोडपं सध्या अफ्रीकन पोपटामुळे चर्चेत आलं आहे. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात या जोडीनं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बाबत पत्नीकडून घटस्फोट मिळवण्यासाठी पतीनं अजब मागणी केली आहे. लग्नाआधी पतीनं पत्नीला एक आफ्रिकन पोपट भेट दिला होता. आता तो आफ्रिकन पोपट परत दिल्यानंतरच मी तुला घटस्फोट देईन अशी मागणी करत पतीनं न्यायालयात घटस्फोटासाठीची ही अट ठेवली. प्राथमिक माहितीनुसार रणवीर आणि प्रणिता (दोघांची नावे बदललेले आहेत) यांचा विवाह 2019 मध्ये पुण्यातच झाला होता. दरम्यानच्या काळात गेल्या चार पाच वर्षापासून या पती-पत्नीचे मतभेद असल्यामुळे या दोघांचा संसार सुरळीत चालला नाही.
सरतेशेवटी नात्यातील कटूता पाहता या दोघांनाही पुण्यातील कौटुंबीक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. या अर्जादरम्यान घटस्फोट जर द्यायचा असेल तर पतीने पत्नीला पहिल्या भेटीत, भेट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत दिल तरच तुला घटस्फोट देईन असं सांगितलं ज्यामुळं आता पुण्यातील कौटुंबीक न्यायालयात या घटस्फोटाचीच सध्या चर्चा सुरू आहे.