Pune Crime News: काही दिवसांपूर्वी पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुल रोखून गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तीन दिवसांत तीन गोळीबाराच्या घटना घडल्यामुळं शहरात एकच खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. आरोपीचे नाव एकून सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील आरोपींना अटक केली आहे.
जंगली महाराज रस्त्यावर आठवड्याभरापूर्वी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा गोळीबाराचा प्रयत्न वडिलांनीच घडवून आणल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून खून करण्याची सुपारी वडिलांनीच गुंडाना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी वडिलांसह सहाजणांना अटक केली आहे.
धीरज दिनेशचंद्र अरगडे-पाटील यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गोळीबाराच्या हल्लेप्रकरणी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी, अरगडे हाइट्स इमारतीजवळ 16 एप्रिल रोजी दुपारी बांधकाम व्यावसायिक धीरज यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तुल रोखले. मात्र पिस्तुलातून गोळी न सुटल्याने धीरज बचावले आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न फसला.
पोलिसांनी या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसंच, धीरज यांच्या निकटवर्तीय आणि कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना चौकशीत लक्षात आले की, धीरज आणि त्यांचे वडिल दिनशचंद्र यांच्या कौटुंबिक कारणावरुन वाद झालेत. मालमत्तेवरुनही त्यांच्यात वाद होते. त्यामुळं पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर धक्कादायब बाब समोर आली आहे. आरोपी दिनेशचंद्र यांनी धीरज यांना जीवे मारण्यासाठी 75 लाखांची सुपारी दिली होती. बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे यांच्यावर 10 मार्च रोजीदेखील हल्ला झाला होता. मात्र तेव्हा ते बचावले होते. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्या वडिलांना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून 20 लाख रुपये उकळले होते. मात्र, धीरज बचावल्याचे कळताच आरोपींचा हल्लेखोरांसोबत वाद झाला होता. दुसऱ्या प्रयत्नातही सुदैवाने धीरज हे बचावले.
धीरज यांचा घटस्फोट झाला होता. ते एका तरुणीसोबत राहत होते. वडिलांना ही गोष्ट खटकत होती. तसंच, कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या वादातूनच धीरज यांची हत्या करण्याचा कट त्यांच्या वडिलांनी रचला. यासाठी त्यांनी 75 लाखांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे-पाटील (वय ६४, रा. भोसलेनगर), प्रशांत विलास घाडगे (वय ३८, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय ४८, रा. एरंडवणे), प्रवीण उर्फ पऱ्या तुकाराम कुडले (वय ३१, रा. सुतारदरा, कोथरुड), योगेश दामोदर जाधव (वय ३९), चेतन अरुण पोकळे (वय २७) यांना अटक करण्यात आली आहे.