BTSग्रुपचा नाद! ८वीत शिकणाऱ्या मुलींनी गाठला कळस; कोरियाला जाण्यासाठी घर सोडले अन्...

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आठवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घरातून निघून गेल्याची घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 1, 2023, 05:46 PM IST
BTSग्रुपचा नाद! ८वीत शिकणाऱ्या मुलींनी गाठला कळस; कोरियाला जाण्यासाठी घर सोडले अन्...  title=
pune news 8th standert girl left home to go to South Korea For Bts group

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune News Today: विश्रांतवाडी परिसरातील आठवीत शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुली घरी न सांगता मुंबईला आल्या. बराचवेळ झाला तरी मुली घरी न परतल्यामुळं त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही लगेचच सूत्र हलवत दोघींना शोधून काढले आहे. मात्र, या मुलींनी घर का सोडले याचे कारण ऐकून पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. 

पालकांची तक्रार मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवली  त्यानंतर रात्री दोन वाजता पालकांना मुंबईत मुली सुखरूप आढळून आल्या आहेत. विश्रांतवाडी परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुली राधा आणि गौरी (नावे बदलली आहेत) या शाळकरी मुलींनी घर सोडून दक्षिण कोरिया गाठण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रयत्नात त्या मुंबईला गेल्या होत्या. 

दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 2:30 दरम्यान आपली मुलगी राधा बराच वेळ घरात नाही हे वडिलांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गुगलवर समाजसेवक समीर निकम यांना मदतीसाठी फोन केला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली. दरम्यान, तिच्या बरोबरच शाळेतील गौरीसोबत असल्याची माहितीदेखील पोलिसांना मिळाली.

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सापरस पोलिस चौकीतील सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख यांनी तत्काळ सर्व यंत्रणांना माहिती दिली. दोन मुली अचानक घरातून बेपत्ता झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हेदेखील कळायला मार्ग नव्हता. 

एकीकडे पालक पोलिसांसमोर चिंता व्यक्त करत होते. त्याच दरम्यान, एका मुलीच्या आजीला मुंबईतून फोन करण्यात आला होता. हीबाब समीर निकम यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली. पोलिसांनी त्याचनंबरवरुन फोन केला. तेव्हा समोरून एक टॅक्सी ड्रायव्हर बोलत होता.

पोलिसांनी या ओला ड्रायव्हरला फोनवरूनच गाडी थांबवून तेथील ट्राफिक हवालदारास फोन देण्यासाठी दम भरला. हवालदारा पोलिसांनी जवळच्या पोलिस ठाण्यात मुलींना घेऊन जाण्यास सांगितले. इकडून पालकांना मुंबईच्या दिशेने मुलींना घेण्यासाठी पाठवले. हा सर्व घटनाक्रम रात्री 2 वाजेपर्यंत सुरू होता. विश्रांतवाडी पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे दोन मुली सुखरूप घरी पोहचल्याने पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. 

म्हणून मुली निघाल्या होत्या दक्षिण कोरियाला 

सध्या मुला-मुलींमध्ये बीटीएस या दक्षिण कोरियाच्या बँडग्रुपचे खूप आकर्षण आहे. या ग्रुपची गाणी आणि त्यांचा डान्स सोशल मीडियावर तर लोकप्रिय आहेच. त्याचबरोबर त्यांचे चाहतेही जगभरात आहेत. या मुलींनादेखील या ग्रुपचे खूप आकर्षण आहे. त्यांना कुठून तरी माहिती मिळाली की, मुंबईत या शोचे ऑडिशन होते अन् ऑडिशन झाले की, ते दक्षिण कोरियाला घेऊन जातात. त्यामुळे या मुली पुण्यावरून मुंबईत रविवारी पोहचल्या, अशी माहिती अन्सार शेख यांनी दिली आहे.